नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कांद्याला (Onion) हमीभाव, चाळीत खराब होणाऱ्या कांद्याला विमा संरक्षण आणि कांदा निर्यातीसाठी अनुदान या प्रमुख मागण्यांसाठी आज (मंगळवार) नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
जिल्हाधिकारी (Collector) रजेवर असल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या मांडला होता. हातात कांदे घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी ते फोडत, “कांद्याचा भाव द्या, नाही तर सरकारचा भाव घ्या”, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्याकडे निवेदन देण्यासाठी शेतकऱ्यांना नेले जात असताना त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर कांदे फोडून तीव्र नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी दालनाबाहेर कांदा-भाकरी आणि कांद्याची भाजी खात सरकारचे (Government) लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी “कांदा सडतोय, पण मदत मिळत नाही. कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारकडे या सगळ्याचे उत्तर आहे का?” असा सवाल आंदोलक शेतकऱ्यांनी उपस्थित केला. तसेच कांद्याच्या बाजारभावातील सातत्याने होत असलेली घसरण शेतकऱ्यांच्या आर्थिक कोंडीला कारणीभूत आहे. सरकारने तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करू “, असा इशारा कांदा उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
- कांद्याला किमान हमीभाव द्यावा.
- चाळीत खराब होणाऱ्या कांद्याला विमा संरक्षण मिळावं.
- कांद्याच्या निर्यातीसाठी तातडीने अनुदान जाहीर करावं.
- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ठोस निर्णय घ्यावा.




