नाशिक | भारत पगारे | Nashik
काेणत्याही गंभीर गुन्ह्याच्या तपासाला व संवेदनशील किंवा काेणत्याही ‘मर्डर मिस्ट्री’त वैज्ञानिक दिशा आणि अधिक सबळ पुरावे प्राप्त करण्यासाठी नाशिक पाेलिसांना (Nashik Police) दाेन अत्याधुनिक ‘फाॅरेन्सिक व्हॅन’ मिळाल्या आहेत. त्यामुळे पुढील टप्प्यात गंभीर व संवेदनशील गुन्ह्यांच्या तपासाचा वेग वाढण्याची चिन्हे आहेत. कालपरत्वे गुन्ह्यांचे स्वरुप, माेड्स (पद्धती) बदलली असून पारंपरिक तपासावर अवलंबून न राहता आता गुन्हे तपासात एआयसह आधुनिक तंत्रज्ञान व फाॅरेन्सिक सायन्सचा (Forensic Van) वापर अलिकडे वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणूण फाॅरेन्सिकची कुशल टीम नव्या व्हॅनमध्ये कार्यरत असणार आहे.
भारतीय न्याय संहितेनुसार सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गंभीर व संवेदनशील गुन्ह्यांत ‘फॉरेन्सिक’ (न्यायसहाय्यक वैज्ञानिक) पथकाचा पंचनामा अनिवार्य आहे. तर, २०२३ मध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम, २०२३ हे तीन नवीन फौजदारी कायदे मंजूर झाल्यानंतर, १ जुलै २०२४ पासून या तीनही कायद्यांची अंमलबजावणी (Implementation) होत आहे. यात भारतीय न्याय संहितेनुसार (बीएनएस) पोलिसिंगमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
याआधी खून (Murder) किंवा शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये ‘फॉरेन्सिक’ युनिटची मदत घेऊन घटनास्थळी पंचनामा व तपास हाेत हाेता. मात्र, नवीन कायद्यान्वये खुनासह प्रत्येक गंभीर गुन्ह्यात ‘स्पॉट पंचनामा’ वेळी व्हिडिओ, इ साक्ष व फोटो बंधनकारक आहेत. त्यासाठी ‘फॉरेन्सिक’ पथक पुरावे संकलित करुन पोलिसांसमक्ष सध्या पंचनामा पूर्ण केला जात आहे. यासंदर्भातील चार मिनिटांचे व्हिडिओ पोलिसांना ‘सीसीटीएनएस’वर अपलोड करावे लागत आहेत. त्यामध्ये पंचनाम्याची तारीख व वेळ नोंद होत आहे.
नवीन कायद्यानुसार तातडीने तपास व पंचनामा करण्यासाठी ‘फॉरेन्सिक’ वाहनांची निकड भासत हाेती, शहर पोलीसांकडे सध्या एक तर ग्रामीण पोलिसांकडे दोन वाहने कार्यरत असताना न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेमार्फत (फॉरेन्सिक विभाग) नुकतीच विभागनिहाय वाहने (Vehicles) देण्यात आली आहेत. तर वाहनांवरील तज्ञांचे मनुष्यबळ ‘फॉरेन्सिंक’ विभागामार्फत पुरविण्यात आले आहे.
दरम्यान, परिणामी, गंभीर गुन्ह्यांचा पंचनामा जलद करून पुढील कायदेशीर प्रक्रियाही वेगवान होत आहे. तसेच, फॉरेन्सिक विभागात काही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली असून ‘ई-साक्ष’ ॲपचा वापर सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी अधिकारी-अंमलदारांकडे ‘ई-साक्ष’चे लॉगिन देण्यात आले असून ‘चार्टशीट’ची अंतिम प्रत संशयितांसह फिर्यादीला देणे बंधनकारक आहे.
काय आहे फाॅरेन्सिक सायन्स
फॉरेन्सिक सायन्स (न्यायवैद्यक विज्ञान) म्हणजे गुन्हेगारी तपासात, न्यायालयात सादर करण्यासाठी आवश्यक पुरावे तपासण्यासाठी वैज्ञानिक पद्धती आणि तंत्रांचा वापर. यामध्ये फिंगरप्रिंट विश्लेषण, डीएनए चाचणी, फॉरेन्सिक रसायनशास्त्र, आणि डिजिटल फॉरेन्सिक्स यांसारख्या विविध शाखांचा समावेश होतो. या शास्त्राचा उपयोग गुन्हे सोडवण्यासाठी, गुन्हेगारांना ओळखण्यासाठी आणि न्यायप्रक्रियेला मदत करण्यासाठी होतो. नाशिक ‘फॉरेन्सिक’मध्ये वर्ग एकचे आठ, दोनचे २८, तीनचे ५३, चारचे ३३ पदे असून, चतुर्थश्रेणी (आउटसोर्सिंग) सहा पदे मंजूर आहेत. एकूण १२८ पदांची आस्थापना आहे, त्यातील ३५-४० पदे रिक्त असल्याची समजते.
फॉरेन्सिक सायन्सचे कार्य
पुरावे गोळा करण्यासह रक्ताचे डाग, केस, हत्यारे, नख, फिंगरप्रिंट्स गोळा करणे आणि जतन करुन पुराव्यांचे विश्लेषण केले जाते. यानंतर, विश्लेषणातून मिळालेले निष्कर्ष न्यायालयासमोर सादर केले जातात. विशेष म्हणजे फॉरेन्सिक सायन्सच्या अनेक शाखा असून यात फॉरेन्सिक बायोलॉजी ही महत्त्वाची शाखा आहे. यातून जैविक पुराव्यांचा अभ्यास व उतींचे विश्लेषण केले जाते, यासह फॉरेन्सिक केमिस्ट्री, डिजिटल फॉरेन्सिक्स, फिंगरप्रिंट विश्लेषण या देखिल उपशाखा आहेत.
‘फॉरेन्सिक व्हॅन’ची वैशिष्टे
- भौतिक पुरावे संकलन : रक्त, केस, कपडे यांचे नमूने थेट घटनास्थळी संकलित करता येतात
- बोटांचे ठसे तपासणी : गुन्हेगार ओळखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठसे त्वरित नोंदवले जातात
- प्रयोगशाळेत विश्लेषण : संकलित केलेल्या नमुन्यांची शास्त्रीय तपासणी
- माेबाईल व्हॅनमध्ये स्फोटक पदार्थ तपासणीसाठी आवश्यक कीट्स
- रक्त, डीएनए टेस्टिंग सॅम्पल
- बलात्कारासारख्या गुन्ह्यातील प्रत्यक्ष पुरावे गोळा करण्याची व्यवस्था
- प्रत्येक मोबाईल व्हॅनमध्ये सीसीटीव्ही, जे पोलीस यंत्रणेशी जोडले आहेत.





