Thursday, May 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज-का-रण- : कार्यक्षेत्रावरून वाघोबांची स्वैर भरारी

राज-का-रण- : कार्यक्षेत्रावरून वाघोबांची स्वैर भरारी

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

- Advertisement -

राजकारणात हे खरोखरीचे वाघ कुठून आले आणि त्यांच्या वर्तनाचा येथे काय संबंध असाही प्रश्न मनात येऊ शकतो. परंतु त्याला कारणही तसेच घडले आहे. सध्या राजकारणातील वाघाचे पितृत्व शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आले आहे. हे त्यांच्याकडे चालत आले की त्यांनी ते आक्रमकतेने हिसकावून घेतले हा विषय घडीभर बाजूला ठेवू. पण खरे वाघ आपणच असा दावा हे सारे शिंदेंचे वाघ करीत असतातच. पूर्वीचे जे स्वत:ला आजही मूळ वाघाचे वारस समजतात, त्यांना तर हे नवे वारस, वाघ नव्हे मांजर संबोधतात.

वाघांच्या क्षेत्रनिश्चितीबाबत अभ्यासातून अत्यंत उद्बोधक माहिती मिळते. वाघ हे आपले क्षेत्र मूत्र फवारून, झाडांवर नखांचे ओरखडे काढून, विष्ठेचा वापर करून आणि जमिनीवर रेघोट्या मारून निश्चित करतात, असे हा अभ्यास सांगतो. एका वाघाला शिकारीसाठी साधारणपणे शंभर चौरस कि.मी. एवढे क्षेत्र लागते. पुढील संदर्भ हा अत्यंत महत्त्वाचा आणि त्यापासून काही शिकावे असा आहे. एक वाघ हा सहसा दुसर्‍या नर वाघाला आपल्या क्षेत्रात येऊ देत नाही. त्यामुळेच हा संघर्ष टाळण्यासाठी दोघांनाही हे प्रादेशिक चिन्हांकन मदत करते. समजा जर एखादा वाघ मरण पावला, तर त्याचे क्षेत्र काही दिवसांत किंवा आठवड्यांत दुसरा वाघ काबीज करतो.

आज रविवारी हे वाघ आख्यान का लावले असे वाचकांना वाटू शकते. ते खरेही आहे. राजकारणात हे खरोखरीचे वाघ कुठून आले आणि त्यांच्या वर्तनाचा येथे काय संबंध, असाही प्रश्न मनात येऊ शकतो. परंतु त्याला कारणही तसेच घडले आहे. सध्या राजकारणातील वाघाचे पितृत्व शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आले आहे. हे त्यांच्याकडे चालत आले की त्यांनी ते आक्रमकतेने हिसकावून घेतले हा विषय घडीभर बाजूला ठेवू. पण खरे वाघ आपणच असा दावा हे सारे शिंदेंचे वाघ करीत असतातच. पूर्वीचे जे स्वत:ला आजही मूळ वाघाचे वारस समजतात, त्यांना तर हे नवे वारस, वाघ नव्हे मांजर संबोधतात. हा अलीकडचा वाद सर्वश्रुत असल्याने त्या खोलात जाण्याची गरज नाही. तसेही नमनालाच घडाभर झाल्याने मूळ विषयाला हात घातला पाहिजे. तर झाले असे की, या नववाघांच्या स्थानिक सरदारांची एक बैठक नुकतीच नाशकात पार पडली.

या बैठकीला आलेले या सर्व सरदारांचे कर्तेकरविते उदय सामंत उपस्थित होते. नाशिकमध्ये सिंहस्थानिमित्त सध्या जे काही चालले आहे, त्याचाच एक भाग म्हणून उद्योग कुंभ अशीही एक खिडकी नव्याने खुली झाली आहे. तर या उद्योग कुंभासाठी साक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दादा भुसे आदी मंत्रिगण हजर होते. समस्त अधिकारी वर्ग तसेच औद्योगिक वर्तुळातील अनेक जानेमाने धुरंधरही अर्थातच हजर होते. ताज गेट वे या पंचतारांकित प्रासादात हा औद्योगिक विचारांचा कुंभ रिता झाला. या वैचारिक मंथनातून जे काही अमृतकण बाहेर पडले त्यातून नाशिकला हजारो कोटींची गुंतवणूक मिळाली, हजारो हातांना काम मिळणार असल्याचे सांगितले गेले. नाशिक हे आता कसे ग्लोबल म्हणजे जगातील अव्वल शहरांमध्ये गणले जाणार हेदेखील पुन्हा पुन्हा सांगितले गेले.

सिंहस्थानिमित्ताने नाशिकमध्ये जी काही कोट्यवधी लोकांची गर्दी होणार आहे, त्यातून किमान काही लाखभर कोटींचे द्रव्य नाशिकच्या रामाचरणी नक्कीच पडणार, त्यामुळे आता नाशिककरांनाही स्वर्ग जणू दोन बोटेच उरला असल्याचे वाटू लागल्यास नवल नाही. साक्षात राज्यप्रमुखांनीच असे सांगितल्याने नाशिककरांनी आता सुखेनैव जगण्याची तयारी करायला हरकत नाही. तर असो, विषय वाघांपासून थेट द्रव्याकडे सरकला. तर झाले काय की, या कुंभासाठी येणारच आहोत तर आल्यासरशी एक संघटनात्मक कामही उरकून घ्यावे या उदात्त हेतूने सरदार वाघोबा उदय सामंतांनी आपल्या शागीर्दांना कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्याचे आदेश दिले. आदेशाबरहुकूम बैठक झाली. पण तेथील उपस्थिती पाहून साहेबांची सटकली. त्यांनी उपस्थित सर्वांबरोबरच पदाधिकार्‍यांचीही चांगलीच कानउघाडणी केली. गटबाजी व अंतर्गत मतभेदांमुळे नाशिक जिल्हा पक्षाचा बालेकिल्ला बनण्यात अडथळा येत असेल तर हे दुर्दैव आहे. पक्षात एकच आणि तोदेखील एकनाथ शिंदे यांचाच गट आहे. यापुढे पक्षाला डॅमेज करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.

आपण येथे समांतर पक्षसंघटना स्थापन करायला नव्हे तर स्थानिक पदाधिकार्‍यांना सहकार्य करण्यासाठी व पक्ष बळकट करण्यासाठी आलो आहोत, असा सज्जड दम सामंत यांनी दिला. नाशिक जिल्ह्याचा संपर्कमंत्री म्हणून माझी नियुक्ती झालेली असली तरी त्यातून मला स्वत:चा गट वा समांतर यंत्रणा उभी करावयाची नाही, हे त्यांनी स्पष्ट करताना हा इशारा नेमका कोणाला दिला, याची चर्चा नंतर सर्वत्र सुरू राहिली. आपापल्या जिल्ह्यातील संघटनेची कामे सोडून अनेक जिल्हा प्रमुख तसेच पदाधिकारी मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मुंबईत ठाण मांडून बसतात. कशासाठी येतात? आम्ही आहोत ना तुमची कामे करायला, असा टोला त्यांनी लगावला खरा, पण तो कोणाला याचीही नंतर खमंग चर्चा होऊन प्रत्येकाने आपणच कसे साव असा आव आणत मी नाही त्यातली अशी भूमिका घेतली. आपणच आपली आचारसंहिता ठरवायला हवी. सगळेच नेते व्हायला लागले तर कार्यकर्ते तरी कोण राहणार, असा जमालगोटाही शेवटी त्यांनी दिला.

पक्षाला पुनर्वैभव आणायचे असेल तर अशा तुटपुंज्या उपस्थितीने कसे भागणार असा रोकडा सवाल करतानाच जे काही चालले आहे ते योग्य नाही. असे चालणार नाही वगैरे बरीच आदळआपटही त्यांनी केली. सामंतांचा चांगुलपणा आजवर सर्वांनीच बघितला होता, पण नंतरचा हा रूद्रावतार पाहून पदाधिकारी घाबरले. उपस्थिती अगदीच तोकडी कशी यावर मग खल सुरू झाला. त्या मंथनातून जे काही हलाहल बाहेर पडले त्यामुळे खरे तर ही वाघाची कथा पुढे आली. हे सगळेच वाघ. त्यामुळे एकमेकांचे कार्यक्षेत्र त्यांनी चिन्हांकित करून ठेवलेले. आता भुसेंच्या कार्यक्षेत्रात सामंतांची एन्ट्री झाल्यावर संघर्ष अटळच होता. झालेही तसेच, असे दिसते. दोन्हीही मंत्री याचा हमखास इन्कार करतीलच. पण मग सामंतांनी जो काही गोळीबार केला तो वायफळ तर अजिबात नव्हता. त्यांचे लक्ष्य नेमके होते. मुंबईला कोण ठाण मांडून बसतो, कोण नेता व्हायचा प्रयत्न करतो, गटबाजी कोण करतो ही सारी यच्चयावत माहिती सामंतांकडे असावी, म्हणूनच त्यांनी एकेकाला वेचून ठेचले. समझने वालों को इशाराही काफी है, असे म्हणतात.

हे खरे असले तरी सध्या या वाघांच्या जंगलात केवळ डरकावून भागत नाही, अशीच वेळ आल्याचे सामंतांच्या एकूणच वक्तव्यातून दिसते. सामंतांना एवढी दमबाजी करावी लागली याचाच अर्थ पक्षसंघटनेत काहीच आलबेल नाही. पालिका निवडणुकीनंतर महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप करीत जे काही नाटक वठविले त्यातून पक्षाच्या आतील उसवलेले बरेच काही बाहेर आले. सध्या पक्षात काय चालले आहे, हे सर्वांनाच कळते, अगदी बोलण्या, चालण्यातूनही दिसते. कोण कोणाला टाळतो, कोण कोणाला कॉर्नर करतोये हे सगळं उघड आहे. सामंतांनीही जे त्यांना समजले ते स्पष्टपणे बोलायला हवे होते. असा हवेत गोळीबार केल्यामुळे ‘जो जे वांछिल तो ते लाहो’सारखी स्थिती झाली. शिवसेनेत कोणी नाही म्हटले तरी गटबाजी आहे, ती किती टोकदार झाली आहे त्याची स्पष्टता सामंतांच्या वक्तव्यातून कळली आहेच. संपर्क प्रमुख म्हणून नियुक्त झालेले आमदार सुहास कांदे यांनीही उपस्थितीविषयी नाराजी व्यक्त केली. पण सध्या जे काही गट आहेत, त्यांच्यात तह करण्याचा मध्यंतरी साक्षात एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांनी थेट बोलावूनही प्रयत्न करून पाहिला आहे.

साहेबांनी ढोस दिल्यानंतर नाशकात आल्यानंतर दोन्ही गट मात्र आपलीच कशी सरशी झाली आणि विरोधकांना कसा जमालगोटा दिला, अशीच टिमकी मिरवित राहिल्याने शेवटी फलनिष्पत्ती मोठ्ठा शून्य अशीच राहिली. आताही ढोबळमानाने उदय सामंत, भाऊ चौधरी, प्रवीण तिदमे असा एक गट दिसतो तर दादा भुसे, अजय बोरस्ते, विलास शिंदे यांचा दुसरा गट दिसतो. मध्यंतरी चौधरी गटात असलेले विजय करंजकर यांनी पुन्हा एकदा कोलांटउडी घेत गट बदलला असल्याची माहिती आहे. माजी खासदार हेमंत गोडसे हे या बैठकीतही दिसले नाहीत. विधान परिषदेत वर्णी लागण्याची त्यांना फार आस होती, वाशिमच्या भावना गवळी यांचा पराभव झाल्यानंतरही त्यांना विधान परिषदेवर संधी दिली गेल्याने गोडसेंचे हौसले बुलंद झाले होते. पण पुन्हा एकदा त्यांचा अपेक्षाभंग झाल्याने असेल कदाचित पण सध्या त्यांनी पक्षापासून अंतर राखले की काय अशी शंका पक्षातच दबक्या आवाजात सुरू आहे.

ही सारी गटबाजी उघडपणे दिसते आहे. त्याची किंमत वेगळ्यावेगळ्या ठिकाणी पक्ष मोजतोही आहे. पण सगळे जण मात्र असे काहीच नाही, हे सांगायला मोकळे असतात. पक्षातील या मुखंडांच्या अशा पवित्र्यामुळे संघटनेला भविष्यात आणखी मोठी किंमत मोजावी लागू शकते. याची जाणीव झाल्यानेच सामंत यांनी खडे बोल सुनावले आहेत. वाघांमधील हा संघर्ष कार्यक्षेत्राबरोबरच अधिकार क्षेत्राचाही दिसतो आहे. त्याचमुळे यापुढे संबंधितांची ही क्षेत्रे चिन्हांकित करून द्यावी लागतील. तरीही अतिक्रमण झालेच तर मग रक्तरंजित संघर्ष अटळ दिसतो.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : एटीएसची झाडाझडती! राज्यात नाशिकसह चाळीस ठिकाणी छापे;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पाकिस्तानातील (Pakistan) लाहोरचा (Lahor) कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्या सिंडिकेटशी संबंधित संशयास्पद संपर्कांवर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने बुधवारी पहाटेपासून राज्यासह नाशिक...