पंचवटी । प्रतिनिधी Panchavati
पेठरोडवरील मेहेरधाम, शिवतेजनगर येथील ‘बालाजी रो-हाउस’मध्ये गुरुवारी (ता. २५) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गॅस गळतीमुळे घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत घरात आग लागून सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. मात्र, घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, तसेच घरातील दुसरे भरलेले सिलिंडर बाहेर काढल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, मेहेरधाम परिसरातील बालाजी रो-हाउसमध्ये सोनाली महाले या आपल्या कुटुंबीयांसह राहतात. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे घरातील सर्व कामे आटोपून त्या कामावर निघून गेल्या होत्या. त्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक घरामध्ये सिलिंडरचा प्रचंड मोठा स्फोट झाला. काहीतरी फुटल्याचा तीव्र आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. शेजाऱ्यांनी तात्काळ महाले यांच्या घराकडे धाव घेतली असता, घरातून मोठ्या प्रमाणावर धूर आणि आगीच्या ज्वाला बाहेर पडताना दिसल्या. एका सुजाण नागरिकाने वेळ न गमावता या घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला दिली.घटनेचे गांभीर्य ओळखून पंचवटी अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ बंबासह घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. विशेष म्हणजे, घरात आग धगधगत असतानाच जवानांनी जीवाची बाजी लावून दुसरे भरलेले गॅस सिलिंडर सुरक्षितरीत्या बाहेर काढले. यामुळे पुढील भीषण अनर्थ टळला.
लोकप्रतिनिधींकडून पाहणी
घटनेची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका दिपाली गिते यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि महाले कुटुंबाला धीर दिला. पंचवटी अग्निशमन केंद्राचे प्रमुख संजय कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली लीडिंग फायरमन एस. डी. जाधव, बी. पी. लहांनगे, एस. बी. शिलावट, ट्रेनी फायरमन दिनेश चारोस्कर, सिद्धांत गोतीस, मेहुल उगले आणि वाहनचालक डी. व्ही. काकडे यांनी अथक परिश्रम घेत आग पूर्णपणे आटोक्यात आणली. या आगीत महाले यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून, पंचनामा करण्याचे काम सुरू होते.




