नाशिक रोड | प्रतिनिधी | Nashik Road
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद भारतीय जनता पक्षालाच (BJP) व गिरीश महाजन यांनाच मिळाले पाहिजे अन्यथा आम्ही उपोषण करू असा इशारा भारतीय जनता पार्टीचे उत्तर महाराष्ट्र सह संपर्कप्रमुख भानुदास घुगे यांनी दिला आहे.
या संदर्भात घुगे यांनी म्हटले आहे की राज्यात भारतीय जनता पक्षाचे 132 आमदार असताना सुद्धा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे मुद्दामून महायुतीमध्ये खोडा घालण्याचे काम करीत आहे. नाशिक जिल्हा पालकमंत्री पदी गिरीश महाजन यांनाच पुन्हा नेमणूक करावी. जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार असताना सुद्धा एकाही आमदाराला मंत्रिपद देण्यात आले नाही, असे असतांना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दोन तर शिवसेनेला एक मंत्रिपद देण्यात आले. जिल्ह्यात शिवसेनेचे केवळ दोनच आमदार आहे.
दोन आमदारांच्या (MLA) जोरावर पालकमंत्री पद कसे काय मागता असा सवाल सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्याचप्रमाणे गिरीश महाजन हे अनुभवी मंत्री असून गेल्या सिंहस्थमध्ये त्यांनी योग्यरित्या कामगिरी करून सिंहस्थ यशस्वी केला व नाशिक शहराचाही त्यांनी विकास घडवून आणला. दोनच दिवसापूर्वी दिवसापूर्वी पालकमंत्री पदावर त्यांचे नेमणूक केली या नेमणुकीनंतर जिल्ह्यात भाजपा सह इतर पक्षांनीही समाधान व्यक्त केले. मात्र शिवसेना शिंदे गट दबावतंत्र करून पुन्हा पालकमंत्री पद मिळवू पाहत आहे असे झाल्यास भाजपावर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही असा इशाराही भानुदास घुगे यांनी दिला आहे.
मोरे यांचा इशारा
दरम्यान कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे नेते व महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार गिरीश महाजन यांची पुन्हा पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात यावी. शिवसेनेची जिल्ह्यात काही ताकद नाही अशा पक्षाच्या आमदारांना पालकमंत्री करू नये अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र मोरे यांनी दिला आहे.