नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) वतीने शहरातील रुग्णालयांची (Hospital) नोंदणी अन् परवाना नूतनीकरण ऑनलाईन करण्याचा निर्णय आयुक्त मनीषा खत्री यांनी घेतला आहे. खासगी रुग्णालयांची नोंदणी, तसेच परवाना नूतनीकरणासाठी विविध कारणांसाठी अडवणूक केली जाते. यामुळे आता आरोग्य विभागातील कामकाजात पारदर्शकता यावी म्हणून पोर्टल तयार करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत रुग्णालयांची नोंदणी व परवान्यांसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार वैद्यकीय विभागाने स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाचा कारभार पारदर्शक होण्यासाठी मदत होणार आहे. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांच्या उपस्थितीत या पोर्टलचे (Portal) सादरीकरण झाले. पोर्टलची चाचणी यशस्वी झाल्याने मंगळवार (दि. १५) पासून ऑनलाईन नोंदणी आणि नूतनीकरण सुरू होणार आहे.
महापालिका हद्दीत जवळपास ५७१ रुग्णालये, प्रसूतिगृहे व नर्सिंग होम्स आहेत. मुंबई सुश्रूषागृहे अधिनियम, तसेच सुधारित नियमान्वये महापालिके च्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी करून परवाना घेणे. तसेच, निर्धारित कालावधीनंतर परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. विविध प्रकारच्या परवानग्या, तसेच एनओसी अशी अनेक कागदपत्रे वैद्यकीय विभागाकडे जमा केल्यानंतरच नोंदणी किंवा परवाना नूतनीकरण केले जाते.
दरम्यान, यासाठी वैद्यकीय विभागासह (Medical Department) अग्निशमन, नगररचना विभागाकडून रुग्णालयांची, तसेच डॉक्टरांची पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी होत्या. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनने मनपा आयुक्तांकडे तक्रारी करत पारदर्शकता आणण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता परवानग्यांसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले.