सप्तशृंग गड |वार्ताहर | Saptashringad
चैत्रोत्सवानिमित्ताने (Chaitra Utsav) सप्तशृंगी गडावर (Saptashrungi Gad) भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. काल रात्रीपासूनच सप्तशृंगी गडावर भाविकांचे जथ्थेचे जथ्थे दर्शनासाठी मुक्कामी येत आहेत. तर आज (गुरुवार) पहाटे पाच वाजल्यापासून अचानक भाविकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने मंदिर प्रशासनावर मोठा ताण निर्माण झाल्याचे दिसून आले.
भाविकांचे (Devotees) दर्शन सुलभ व्हावे यासाठी पहाटे पाच वाजेपासूनच पायऱ्यांमध्ये ठिकठिकाणी बाऱ्या लावण्यात आल्या होत्या. लाखो भाविक चैत्रोत्सवासाठी उपस्थित झाल्यामुळे पोलीस प्रशासन व ट्रस्ट आपत्ती व्यवस्थापन यांची एकच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. तर मंदिर गाभाऱ्यापासून ते पाटील चौक ते दवाखान्यापर्यंत बाऱ्या लावण्यात आल्या होत्या. तर वेटिंग हॉलच्या खाली एकही पोलीस कर्मचारी नसल्याने भाविकांची एकच गर्दी (Crowd) झाली होती.
तसेच काही ठिकाणी जुने बॅरिकेट्स लावल्याने ते तुटून गेले, त्यामुळे लहान मुले वयोवृद्ध महिला व पुरुष यांचे मोठे हाल झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, ट्रस्ट व पोलिसांच्या नियोजन शून्य कारभारामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट यावेळी दिसून आली. तर बाऱ्या लावल्यामुळे भवानी चौकातील सर्व व्यावसायिकांचे धंदे ठप्प झाले होते. यावेळी भाविकांच्या ‘बोल आंबा माता की जय, बोल मेरी मैया अंबे मैया अंबे मैया की जय, परशुराम बाला की जय, मार्कंड ऋषी महाराज की जय, अशा घोषणांनी सप्तशृंगी गड दुमदुमून गेला होता.