Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनाशिक मनपा क्षेत्रातील पूर्व विभागात करोनाचे सर्वाधिक १७५ रुग्ण

नाशिक मनपा क्षेत्रातील पूर्व विभागात करोनाचे सर्वाधिक १७५ रुग्ण

नाशिक । प्रतिनिधी

गेल्या मे महिन्यात करोनाचा मेजर हॉटस्पॉट बनलेल्या मालेगांव शहरातील बाधीतांचा आकडा कमी होत असुन आता करोनाचा विळखा नाशिक शहरावर पडत आहे. करोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असुन मंगळवार (दि.९) पर्यत नाशिक महापालिका क्षेत्रात करोना रुग्णांची संख्या ४८७ झाली असुन यापैकी १६८ जण बरे होऊन घरी पोहचले आहे. तर यात २२ जणांना प्राण गमवावे लागले आहे. शहरातील एकुणच रुग्णांतील सर्वाधिक रुग्ण हे नाशिक पुर्व विभागात असुन या प्रभागाला करोनाचा पाश आवळला जात आहे.

- Advertisement -

नाशिक शहरातील पहिला रुग्ण ६ एप्रिल रोजी हा नवीन नाशिक भागातील गोविंद नगर मनोहरनगर ह्या ठिकाणी आढळून आला होता. त्यांनतर सातपूर अंबड लिंक रोड भागातील संजीवननगर या भागात एकाच कुटुंबातील पाच रुग्ण आढळून आले होते. यानंतर सातपूर कॉलनी भागातील एक महिला मालेगांव तालुक्यात एका दशक्रिया विधीहून परतल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या डझनभर लोकांना करोनाची बाधा झाली होती. अशाप्रकारे गेल्या मे महिन्यात सातपूर विभागात एका पाठोपाठ करोना बाधीत सापडत असल्याने हा विभाग चर्चेत राहिला होता.

मात्र संजीवनगर येथील सर्व रुग्ण बरे झाले. नंतर मे महिन्याच्या शेवटीच्या सप्ताहात संजीवनगर शिवार सुप्रभात वसाहत करोनामुळे चर्चेत आली. याठिकाणी मुंबईहून अंत्ययात्रेहून परतलेल्या एका वृध्दांचा मृत्यु झाल्यानंतर याठिकाणी ९ जणांना बाधा झाल्याचे समोर आले होते. याच मृताच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या पंचवटीतील मार्केट मधील व्यापार्‍याला करोनाची लागण होऊन यात त्यांचा मृत्यु झाला होता. या व्यापार्‍यांच्या संपर्कातील जवळपास १४ जणांना बाधा झाली होती. नंतर पंचवटीतील रामनगर, राहुलवाडी, फुलेनगर, भराडवाडी आदीसह म्हसरुळपर्यत भागात करोना रुग्ण आढळून येत आहे.

वडाळागांव परिसर व वडाळानाका भाग या नाशिकच्या पुर्व विभागात याठिकाणी एका वाहन चालकास करोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले आणि शहरातील बाधीतांच्या संपर्कात आल्याने एक पाठोपाठ रुग्ण याठिकाणी समोर आले. याभागात असलेले झीनतनगर, महेमुबनगर, सादीकनगर यासह खोडेनगर यासह अगदी पखालरोड परिसर, नाईकवाडीपुरा २ वडाळा , वडाळानाका भागातील भारतनगर, इंदिरानगर याभागात करोनाची लागण मोंठ्या प्रमाणात झाली आहे. अजुनही याभागात करोना रुग्ण आढळून येत असुन याच भागात मृतांचा आकडा सर्वाधिक आहे. यानंतर आता करोनाची झळ नाशिक पश्चिम विभागाला बसु लागली आहे. या नाशिक पश्चिम विभागातील जुने नाशिक भागातील नाईकवाडीपुरा, कादरी चौक, सारडा सर्कल, बागवानपुरा, कुंभारवाडा, मोठा राजवाडा याभागात मोठ्या प्रमाणात करोनाची लागण झाली असुन रुग्णांचा आकडा दररोज वाढतच आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या