Friday, May 3, 2024
Homeनाशिककौशल्य विकास अभ्यासक्रमांसाठी प्रोत्साहन

कौशल्य विकास अभ्यासक्रमांसाठी प्रोत्साहन

विद्यापीठांची निर्मिती; विधेयकासाठी समिती

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

कौशल्य विकास अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र विद्यापीठे स्थापन करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जाणार असून अनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित अशा दोन्ही स्वरूपांत ही विद्यापीठे असणार आहेत. नव्याने कौशल्य विकास अभ्यासक्रमांसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण आखण्यात आले आहे.

कौशल्य विकास अभ्यासक्रमांसाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. मात्र, या अभ्यासक्रमांना तुलनेने आजही प्रतिष्ठा कमी आहे. पारंपरिक किंवा व्यावसायिक पदवी किंवा त्यापुढील शिक्षणाप्रमाणे कौशल्य विकास अभ्यासक्रमांकडेही विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा, यासाठी या अभ्यासक्रमांची स्वतंत्र विद्यापीठे स्थापन करण्यात येणार आहेत.

कौशल्य विकास विभागाअंतर्गत ही विद्यापीठे सुरू करण्याची योजना आहे. स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांना परवानगी देतानाच शासकीय अनुदानित विद्यापीठेही स्थापन करण्यात येणार आहेत. या विद्यापीठांचा कायदा करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. यासाठीच्या अधिनियमाचा मसुदा ही समिती तयार करणार आहे.

सध्या राज्यात कौशल्य विकास अभ्यासक्रमांच्या अनेक संस्था सुरू झाल्या आहेत. या संस्थांच्या मान्यतेबाबतही संदिग्धता आहे. या संस्थांसाठी नियमन मसुदाही तयार करण्यात येईल. त्याचप्रमाणे अभिमत विद्यापीठे स्थापन करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाकडे ही समिती प्रस्ताव सादर करेल.

देशभरात दिल्ली, गुडगाव यांबरोबरच अनेक ठिकाणी कौशल्य विकास विद्यापीठे आहेत. त्याचा अभ्यास करून त्यानुसार समिती शासनाकडे अहवाल आणि अधिनियमाचा मसुदा सादर करेल. ही विद्यापीठे कौशल्य विकास विभागाअंतर्गत असतील, असे कौशल्य विभागाच्या सहसचिवांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या