नाशिक । प्रतिनिधी
करोना विरोधातील लढाई ही दीर्घकाळ चालणारी आहे, येणाऱ्या काळात कोरोना रुग्ण दाखल होतील त्यासोबतच ते करोनामुक्त होत राहतील त्यामुळे करोना विरोधातील लढा त्यासोबतच सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन व्यवहार व अर्थकारण सुरु ठेवण्यासाठी व कमीत कमी बंधनात जनजीवन सुरळीत राहील यासाठी प्रशासनाने नियोजन करावे, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केल्या आहेत.
आज जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री.भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वासराव नांगरे-पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधिक्षक (ग्रामीण) डॉ.आरती सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य उपसंचालक डॉ.एम.आर.पटटणशेट्टी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अपर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, संपूर्ण जग बंद, देश बंद, राज्य बंद आणि जिल्हा बंद अशा सारख्या उपाययोजनांमधुन कोरोना सारख्या साथरोगाच्या आजाराशी लढतांना प्रथमच अशा प्रकारच्या समस्येचा अनुभव आला. त्यामुळे त्यातील अडचणी समजल्या. या अडचणींवर मात करत असतांना लोकांच्या मनातील भय कमी झाले. सजक्ता निर्माण झाली. शासन प्रशासकीय पातळीवरही शिकत गेलो, निर्णय घेत गेलो सर्व काही नवीन होते. या साथरोगाशी लढतांना उपाययोजनांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर निश्चितता व अनिश्चिततेचा सामना संपूर्ण जग करते आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्ह्यात कालपर्यंत हाताबाहेर जाणारी मालेगांवची स्थिती आज पूर्णत: आटोक्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागाची परिस्थितीही नियंत्रणात आहे. नाशिक शहरात शहरातील कोरोना बाधीतांची संख्या नगण्य असुन लवकरच आपण सर्व या समस्येतून बाहेर पडू अशा आशा प्रकारची अपेक्षाही यावेळी पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी व्यक्त केली.
करोनाचे रुग्ण ज्याप्रमाणे बरे होत आहेत त्याप्रमाणे ते रोज नव्याने आढळून येत आहेत. प्रत्येक आजारात रुग्ण कमी होणे व जास्त होणे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. तीच प्रक्रिया या आजारालाही लागु आहे. त्यामुळे भविष्यात कुठल्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तरी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा त्यासाठी सज्ज आहे. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी अत्यंत मेहनत घेऊन आजार नियंत्रणात ठेवण्यात यश मिळविले असून भविष्यातही सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे प्रशासन करोनाशी यशस्वीपणे लढा देत राहील, असेही यावेळी श्री.भुजबळ यांनी सांगितले.
बंद काळातील कामगारांचे वेतन अदा करण्यात यावेत.
लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा देणाऱ्या कंपन्या व आस्थापना वगळता सर्व कंपन्या व आस्थापना बंद होत्या. या कालावधीत बंद असलेल्या कंपन्यांकडून कामगार व मजूर वर्गाला पगार दिला जात नसल्याच्या तक्रारी मोठया प्रमाणावर येत आहेत, अशा तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कामगार उपायुक्तांना सूचना देण्यात याव्यात. तसेच कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्या समन्वयातून वेतन व पगार देण्याबाबत निर्णय घेण्यात यावा, याबाबतच्या विशेष सूचना या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनास दिल्या आहेत.
मालेगावच्या पावरलूम बाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची शिफारस करणार
मालेगावातील पावरलूम बंद असल्यामुळे तेथील अर्थकारणावर व सर्व सामान्यांच्या जनजीवनावर मोठा परिणाम होत असून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या माध्यमातून पावरलूम चालक-मालक यांचेशी चर्चा सुरु असून वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून पावरलूम कामगांराच्या समस्यांवर खावटी योजना अथवा सवलतीची योजना देण्याबाबतची शिफारस करणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, माहापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधिक्षक (ग्रामीण) आरती सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील माहिती बैठकीत सादर केली.