नाशिक । प्रतिनिधी
अंगी विविध कला असलेल्यां कलाकारांंना त्यांच्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी भरविण्यात आलेल्या ‘मिस्तुरा फेस्ट’ची सांगता रविवारी धमाकेदार नृत्याने करण्यात आली. या महोत्सवात कलाकारांसह विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी धमाकेदार नृत्य, सुरेल गायन अन विविध कलाकृतीं सादर केल्या. त्याला नाशिककर कलाप्रेमींनी भरभरून दाद दिली.
गंगापूर रोडवरील गोदापार्क येथे गेल्या दोन दिवसांपासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. (दि.२९) रम्य सायंकाळी अखेरच्या दिवशी दिवस कलाप्रेमींनी परीसर गच्च भरला होता. यावर्षी मिस्तुरा आर्ट फेस्टचे आयोजन डिजीटल ट्रान्सफरमेशन अॅन्ड इल्यूजन’ या संकल्पनेवर आधारीत होते. अगदी प्रवेशद्वारापासून तर व्यासपीठापर्यंत आकर्षक अशी सजावट केलेली होती. सायंकाळच्या वेळी गर्दीने उच्चांक गाठला होता.
महोत्सवात काल सुलेखनाची (कॅलीग्राफी) प्रात्येक्षिके, इको-फ्रेंडली आभूषणे उपलब्ध करून दिलेली होती. रॉक बॅण्डचे सादरीकरण तरूणाईसाठी लक्षवेधी ठरले. फेस्टमध्ये लेझर शो अंधाराच्या वेळी आकर्षण ठरत होते. छायाचित्रे टिपण्यासाठीही तरूणाईने गर्दी केली होती. आलेल्या कलाप्रेमींना खरेदीचा आनंद लुटता यावा, यासाठी प्रदर्शनात विविध प्रकारचे स्टॉल उपलब्ध करून दिले होते.
तसेच आयोजकांकडून दोन व्यासपीठ सादरीकरणासाठी उभारलेले होते. सायंकाळच्या वेळी झालेल्या सादरीकरणांनी कलाप्रेमींवर मोहिनी फेरली होती. प्रदर्शनात विविध प्रकरच्या शिल्पांचाही समावेश होता. तसेच विविध चित्रकारांनी साकारलेल्या चित्राकृती व छायाचित्रकारांनी टिपलेल्या छायाचित्रे आकर्षण ठरले.