नाशिक । प्रतिनिधी
विजेची बचत आणि अपारंपारिक उर्जा स्त्रोतांवर भर देण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी अंतर्गत सौर उर्जा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाद्वारे एकूण १ मॅगावॅट विजेची निर्मिती होणार असून महापालिकेच्या मालकीच्या १५ इमारतींतील कार्यालयात नवीन वर्षात सौर उर्जेचा प्रकाश पडणार आहे. यातून ुविजेची मोठी बचत होणार असुन यामुळे महापालिकेचा खर्च कमी होणार आहे.
स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नाशिक शहरामध्ये विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अपारंपारिक उर्जा स्त्रोतांवर भर या दृष्टीने स्मार्ट सिटी अंतर्गत सौर उर्जा प्रकल्प राबविण्यात येत असुन या प्रकल्पाद्वारे एकूण १ मॅगावॅट विजेची निर्मिती केली जाणार आहे. महापालिकेच्या मालकीच्या 15 इमारतींवरील टेरेसवर सदर सौर उर्जा प्रकल्प राबविले जात आहेत. त्यापैकी १२ इमारतींवर सोलर रुफ टॉप बसविण्यात आले आहे.
हा प्रकल्प कार्यारत होऊन नवीन वर्षात महापालिकेची कार्यालये सौर उर्जेत उजळून निघणार आहेत. नाशिक शहरात सौर उर्जेची टक्केवारी सरकारी आणि खासगी संस्थांमार्फत तसेच नागरिकांच्या माध्यमातून वैयक्तीकरित्या राबवून प्रदुषण नियंत्रणासाठी उपयुक्त होणार आहे. साधारणपणे सौरउर्जेच्या वापरातून वर्षाकाठी महापालिकेचे जवळपास १ कोटी रुपये वाचणार आहेत. याचा मुख्य उद्देश हा आहे की नागरिकांनीही सौर उर्जेकडे वळले पाहिजे, ज्यायोगे पारंपारिक उर्जा स्त्रोतांवर येणारा भार कमी होईल आणि शासनाचे पैसेही वाचणार आहे.
२५ वर्षे कालावधीसाठी पीपीपी तत्त्वावर वासंग सोलर वन प्रा. लिमिटेड तर्फे हा प्रकल्प राबवला जात आहे. त्याचबरोबर मे. वासंग सोलर वन प्रा. लि. पुढील २५ वर्षांचा दुरूस्ती आणि देखभाल खर्चही करणार असल्याने स्मार्ट सिटी निधीमधून या प्रकल्पासाठी एकही रुपया खर्च होणार नाही.