Saturday, October 19, 2024
Homeनाशिकजागतिक मराठी राजभाषा दिन : मराठीवर इतर भाषांचे आक्रमण वाढतयं..

जागतिक मराठी राजभाषा दिन : मराठीवर इतर भाषांचे आक्रमण वाढतयं..

साहित्यिक, मान्यवरांचा सूर

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

‘अमृताशी पेैंजे जिंकणारी’ माय मराठी अजूनही अभिजात भाषेेचा दर्जा मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. व्यवहारात मराठीचा वापर कमी झाला आहे. इतर भाषेचे आक्रमण वाढल्याने मराठीचा डौल, नाद, ऐश्वर्य याला बाधा पोहचत आहे. इंग्रजीशी वैर नाही मात्र अमृतासारख्या भाषेचा गोडवा टिकवण्यासाठी सर्वस्तरावर आस्थेने सामूहिक इच्छाशक्तीने प्रयत्न व्हावेत, असा सूर मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला मान्यवरांनी व्यक्त केला.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांचा जन्मदिन जगात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने शहरातील साहित्यिकांनी मराठी भाषेच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. मराठीतील कितीतरी चांगले शब्द काळाच्या ओघात लोप पावत आहे, असे सांगून एचपीटी कला आणि आरवायके विज्ञान महाविद्यालयाच्या पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागाच्या प्रमुख डॉ. वृंदा भार्गवे म्हणाल्या, मराठी भाषेची शैली, साहित्य यामध्ये नवी रुजूवात होत आहे का? हा प्रश्न प्रत्येक मराठी जणांनी विचारला पाहिजे. मराठी दिनाच्या निमित्ताने मराठीबद्दल बोलून तिला घासून लख्ख करण्यापेक्षा दररोज, दरवेळी मराठीच्या अस्तित्वासाठी सर्वांनी झटले पाहिजे. मराठी भाषेचे विविध ‘अ‍ॅप्स’ही आले आहेत तंत्रज्ञानाचा स्पर्श मराठीला झाला असला तरी तिचा वापर राजभाषा, ज्ञानभाषा, व्यवहाराची भाषा म्हणून वाढला पाहिजे, अन्यथा इतर भाषांच्या आक्रमणात अमृताची भाषा मागे पडेल.

कवी किशोर पाठक म्हणाले, आज महाराष्ट्रातील मराठी लोक भेसळयुक्त मराठी वापरत आहेत. मराठीला शाळांमध्ये पर्याय नकोच, तिची सक्तिती हवीच, ‘सीबीएसई’ शिक्षणक्रमात मराठी सक्तिचा विषय केले याचे स्वागत करतो . मात्र इंग्रजी भाषेचे कौतुक करत आणि मराठी भाषा नाकारणार्‍यांना मराठी म्हणून घेण्याचा अधिकार नाही. मराठी बोलली पाहिजे, वाचले पहिजे, तिला समृद्ध करावे, यासाठी सामुहिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न गरजेचे आहे.

मराठी भाषेचे स्वत:चे असे सौंदर्य, नाद आणि ऐश्वर्य आहे असे सांगून संत साहित्याचे अभ्यासक, युवा साहित्यिक स्वानंद बेदरकर म्हणाले, काळाच्या ओघात मराठी बदलत आहे. मात्र या बदलात मराठीचे चुकिचे रुप येता कामा नये. मराठीवर जोरकसपणे इतर भाषांचे आक्रमण होत आहे. कुठल्याही भाषेला विरोध नाही परंतु मराठीचे ऐश्वर्य, लय, डौल हरवता कामा नये.

केव्हा होणार मराठी अभिजात?
मराठी भाषा, तिच्यातील साहित्य, तिचा जाज्वल्य इतिहास बघता मराठी ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आधिक जोरकस प्रयत्नाची गरज आहे, त्यासाठी अधिक प्रयत्न करण्यासह मराठीचा वापर, दर्जा, शुद्धता टिकवणे हे प्रत्येक मराठी जणांचे आद्य कर्तव्य आहे यावर सर्व मान्यवर, साहित्यिक, मराठीप्रेमींचे एकमत दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या