Monday, July 27, 2026
HomeनाशिकNashik News : श्रीक्षेत्र कपिलधारा तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध - मंत्री...

Nashik News : श्रीक्षेत्र कपिलधारा तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – मंत्री भुजबळ

गंगा-गोदावरी पूजन, भूमिपूजन संपन्न

नाशिक | Nashik

श्रीक्षेत्र कपिलधारा-कावनई (Shri Kshetra Kapildhara Kavnai) हे सिंहस्थ कुंभमेळ्याशी ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या निगडित असलेले महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या परिसराचा सर्वांगीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

- Advertisement -

कावनई, ता. इगतपुरी येथे आज मंत्री भुजबळ यांच्या हस्ते आगामी सिंहस्थ महाकुंभाच्या (Simhastha Kumbhmela) पार्श्वभूमीवर आयोजित गंगा-गोदावरी पूजन सोहळा मंत्रोच्चारात विधिवत संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार हिरामण खोसकर, शहापूरचे आमदार शांताराम मोरे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, राजमाता जिजाऊ माॅसाहेब यांचे माहेरकडील शिवाजीराव जाधव, सरपंच गोपाळ पाटील, महंत भक्तीचरणदास महाराज, महंत फलाहारीबाबा महाराज, महंत कल्कीराम महाराज, श्री कपिल महामुनी आश्रम ट्रस्टचे पदाधिकारी, विविध मान्यवर, भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले की, परंपरेनुसार श्रीक्षेत्र कपिलधारा हे सिंहस्थाशी संबंधित प्राचीन तीर्थक्षेत्र असून त्याचा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा जपत नियोजनबद्ध विकास करणे आवश्यक आहे. मागील सिंहस्थानंतर या परिसरात रस्ते, सिमेंट काँक्रीट रस्ते, तलाव विकास, इनर व आउटर रिंग रोडसह विविध पायाभूत सुविधांची कामे करण्यात आली असून उर्वरित कामेही टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक, त्र्यंबकेश्वर व जिल्ह्यातील (District) पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. या भागात ११६ कोटींची विकासकामे सुरू आहेत. आगामी कुंभमेळ्यात देश-विदेशातून लाखो भाविक येणार असल्याने रस्ते, वाहतूक, पार्किंग, पिण्याचे पाणी, स्वच्छता, निवास व्यवस्था व इतर मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

गोदावरीसह (Godavari) सर्व जलस्रोत स्वच्छ, प्रदूषणमुक्त व निर्मळ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगून त्यांनी स्वच्छ भारत अभियानाची भावना कृतीत उतरविण्याचे आवाहन केले. तीर्थक्षेत्रांमध्ये कचरा टाकू नये, परिसर स्वच्छ ठेवावा तसेच वृक्षारोपणाद्वारे पर्यावरण संवर्धनाला चालना द्यावी, असेही ते म्हणाले. धार्मिक पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते. भाविक व पर्यटकांमुळे हॉटेल व्यवसाय, वाहतूक, पूजासाहित्य विक्रेते, स्थानिक व्यापारी आणि शेतकरी यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे ‘अतिथी देवो भव’ या भावनेतून प्रत्येक भाविकाचे स्वागत करून त्यांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी लोकाभिमुख दृष्टीकोन ठेवून दर्जेदार, पारदर्शक आणि वेळेत विकासकामे स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांचा विश्वास संपादन करून वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री भुजबळ यांनी दिल्या.

आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांनी ग्रामपंचायत, तीर्थक्षेत्र विकास समिती आणि प्रशासन यांच्या समन्वयातून तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता व्यक्त केली. भावी कुंभमेळ्याच्या दृष्टीने संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संत-महंतांनी श्रीक्षेत्र कपिलधारा हे प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र असल्याचे सांगत त्याच्या धार्मिक वारशाचे जतन करण्याबरोबरच भाविकांसाठी अधिकाधिक सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्त केली. महंत फलाहारी महाराज यांनी कपिलधारा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. वैष्णव अखाड्यांच्या प्रतिनिधींनी कपिलधारा येथे पारंपरिक स्नानाची निश्चित तारीख 17 ऑगस्ट, 2027 अधिकृतपणे जाहीर करून सिंहस्थ प्राधिकरणाच्या नियोजनात या तीर्थक्षेत्राचा समावेश करण्याची मागणी केली.

ताज्या बातम्या

Crime News : एक कोटींच्या लुटीच्या कटात दोन पोलिसांसह तोतया पत्रकाराचा...

0
पुणे | प्रतिनिधी | Pune पुण्यातील (Pune) सिंहगड रस्ता परिसरातील नवले पुलावर भरदिवसा एका मोठ्या व्यावसायिकाला लुटण्याचा चित्रपटालाही लाजवेल असा थरार घडला असून, याप्रकरणी पुणे...