नाशिक | Nashik
त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे वृत्तांकनासाठी जात असताना, स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून नाशिकमधील (Nashik) इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी पत्रकार योगेश खरे, अभिजीत सोनवणे, किरण ताजणे यांना जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या पत्रकार किरण ताजणे यांची मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिकच्या अपोलो रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. तसेच या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत मारहाण करणाऱ्या गुंडांना कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांना दिल्या.
त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela) पार्श्वभूमीवर आयोजित साधू महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी नाशिक येथून पत्रकार त्र्यंबकेश्वर येथे गेले असता स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना अडवण्यात आले. पत्रकार बांधवांनी आपली ओळख देऊन बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी जात असल्याची माहिती दिली. यावेळी तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यानी पत्रकारांना शिवीगाळ करत धमकी दिली. त्यानंतर पत्रकार गाडीच्या खाली उतरल्यावर झी वृत्त वाहिनीचे पत्रकार योगेश खरे, साम वृत्त वाहिनीचे पत्रकार अभिजित सोनवणे व पुढारी वृत्तवाहिनीचे पत्रकार किरण ताजणे यांना जबर मारहाण केली.
त्यानंतर मुंबई वरून नाशिकच्या (Nashik) दिशेने येत असतांना मंत्री छगन भुजबळ यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील (Balasaheb Ptil) व जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करत या प्रकरणाची चौकशी करून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर सबंधित पत्रकारांना तातडीने नाशिकच्या अपोलो रुग्णालयात उपचार करण्यासाठी हलविण्यात यावे अशा सूचना केल्या.
दरम्यान, या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पुढारी वृत्तवाहिनी पत्रकार किरण ताजणे यांना अपोलो रुग्णालय नाशिक येथे दाखल करण्यात आल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. यावेळी अपोलो रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांशी चर्चा करत माहिती घेतली. तसेच इतर जखमी पत्रकारांना देखील रुग्णालयात तात्काळ हलविण्यात येऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच असे प्रकार पुन्हा होऊ नये तसेच येणाऱ्या सर्वसामान्य भाविकांना देखील याचा त्रास होऊ नये याबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले.




