नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा (Nashik Simhastha Kumbh Mela) अवघ्या दोन वर्षांवर आला आहे. त्यामुळे तयारीला वेग आला असून या पार्श्वभूमीवर नाशिकची (Nashik) वाहतूक समस्या सोडवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपुलासह टायरबेस मेट्रो प्रकल्प (Tirebase Metro project) सिंहस्थापूर्वी मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असल्याची ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना महायुतीत (Mahayuti) अंतर्गत वाद असल्याबाबत त्यांना विचारले असता आमच्यात कोणताही वाद नाही असा दावा करीत लवकरच पालकमंत्रीपद जाहीर होतील आणि त्यानंतर कुंभमेळ्याच्या तयारीला आणखी वेग येईल असे संकेत त्यांनी दिले. शहराला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम करण्यासाठी मुंबई येथे झालेल्या बैठकीत सूचना करण्यात आल्या आहेत. वाहनतळापासून भाविकांची वाहतूक करण्यासाठी वेगळी व्यवस्था करता येईल का याचा विचार सुरू आहे.
दरम्यान, गर्दीवर (Crowd) नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असून कोणत्याही दुर्घटनेशिवाय आपला कुंभ पार पडेल याची पूर्वतयारी केली जाते आहे. भाविकांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून आवश्यकतेनुसार भूसंपादन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय पायाभूत कामे सुरू करण्याला वेग दिला जाणार असून यंदाचा कुंभही चांगल्या घटनांनी स्मरणात राहील असा दावा महाजन यांनी केला.
नायलॉन मांजा कारवाईचा नाशिक पॅटर्न राज्यभर
संक्रांत सणाचा आनंद घेत असताना इतरांच्या दुःखाचे कारण बनण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यामुळे नायलॉन मांजा वापरणाऱ्यांसह विकणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याचा नाशिक पॅटर्न राज्यभर राबवणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. नायलॉन मांजा हाताळणाऱ्या प्रत्येकासह तो तयार करणाऱ्यांवरही कडक कारवाईचे पाऊल यापुढे उचलले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रोहिंग्यांवर गृहखाते करणार कारवाई
मालेगावमध्ये अनेक लोकांचे ओळखपत्र नसून, अवैध कागदपत्रांच्या आधारावर त्यांचे मालेगावमध्ये वास्तव्य असल्याचा आरोपांवर शासन गांभीर्याने काम करत आहे. यासंदर्भात गृहखात्यानेदेखील चौकशी सुरू केली आहे. यात अवैध घुसखोरी केलेल्यांची हकालपट्टी करण्यासोबत त्यांना आसरा व मदत करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.
मुंडे, भुजबळ अंतर्गत प्रश्न
बीडच्या समस्येवर धनंजय मुंडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार अभय देत आहेत का? तसेच छगन भुजबळ नाराज असताना पक्षाच्या अधिवेशनाला ते पोहोचल्याने त्यांना भाजपमध्ये प्रवेश नाकारण्यात आला काय? त्यामुळे ते पुन्हा पक्षाकडे वळाले का? असे विविध प्रश्न विचारले असता ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब असून भाजपत प्रवेशाबाबत आपणास काही माहीत नसल्याचे सांगून त्यांनी प्रश्नाला बगल दिली.