Thursday, January 8, 2026
HomeनाशिकNashik News : मंत्री नरहरी झिरवाळांची शेतकऱ्यांच्या साखळी उपोषणाला भेट; दिले 'हे'...

Nashik News : मंत्री नरहरी झिरवाळांची शेतकऱ्यांच्या साखळी उपोषणाला भेट; दिले ‘हे’ निर्देश

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

दिंडोरी–जोपूळ–पिंपळगाव रस्त्याचे भू संपादन करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी कृती समितीच्या वतीने सुरु असलेल्या साखळी उपोषणाला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी भेट देत आंदोलक शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या मागणीबाबत आपण सकारात्मक असल्याचे सांगत, बांधकाम विभाग व महसूल विभागाने भू संपादन व नुकसान भरपाईबाबत सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. याबाबत 19 जानेवारी रोजी बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री झिरवाळ यांनी दिली.

- Advertisement -

दिंडोरी–जोपूळ–पिंपळगाव हा रस्ता (Road) ग्रामीण मार्ग, जिल्हा मार्ग व राज्य मार्ग असा टप्प्याटप्प्याने विकसित झाला असून, या रस्त्यासाठी आजपर्यंत कोणतेही अधिकृत भू संपादन झालेले नाही, तसेच एकाही शेतकऱ्याला मोबदला मिळालेला नाही, असा शेतकऱ्यांचा ठाम दावा आहे. यापूर्वी हा रस्ता केवळ 3.75 मीटर रुंदीने डांबरीकरण व बाजूने एक मीटर साईडपट्टी ने करण्यात आला होता. सध्या सदर रस्ता 7 मीटर रुंदीने डांबरीकरण करण्यात येणार असून, त्यासोबत बाजूने साईड पट्टी व गटाराचे काम प्रस्तावित आहे.

YouTube video player

या विकास कामाला शेतकऱ्यांचा (Farmer) कोणताही विरोध नसून, रस्त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या जागेचे अधिकृत भू संपादन करून त्याचा योग्य मोबदला द्यावा, अशीच त्यांची भूमिका आहे. मात्र बांधकाम विभागाकडून राज्य मार्गाच्या निकषांनुसार दुतर्फा 20 मीटर क्षेत्र शासनाच्या वर्गात असल्याचा दावा करण्यात येत आहे. याउलट, शेतकऱ्यांच्या मते भू संपादनाची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया आजपर्यंत झालेली नाही, त्यामुळे मोबदला देणे आवश्यक आहे. या संदर्भात यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री व खासदारांच्या उपस्थितीत दोन बैठका झाल्या होत्या.

मात्र बांधकाम विभाग आपल्या शासन परिपत्रक व निकषांवर ठाम राहिल्याने शेतकरी कृती समितीने साखळी उपोषण सुरु केले.उपोषणस्थळी भेट देताना मंत्री झिरवाळ यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. भू संपादन व मोबदला मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे, बांधकाम विभागाचे उप अभियंता गौरव जगताप उपस्थित होते.

दरम्यान, या आंदोलनावेळी जेष्ठ नेते सुरेश डोखळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, युवक तालुकाध्यक्ष कृष्णा मातेरे, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष शिवाजी डांगळे, उपाध्यक्ष माधव उगले,राष्ट्रवादी डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ योगेश गोसावी,शिवसेना तालुकाध्यक्ष अमोल कदम आदी उपस्थित होते.
तसेच माजी आमदार रामदास चारोस्कर,माजी आमदार अनिल कदम, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले,शेतकरी संघटनेचे अर्जुन बोराडे,म.वि.प्र. संस्थेचे संचालक प्रविण जाधव, भाजप तालुकाध्यक्ष शाम मुरकुटे, वसंत कावळे, योगेश तिडके मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष मनोज ढिकले आदींनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

ताज्या बातम्या

Nashik Crime : २८ लाख रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त; तिघांवर गुन्हा

0
बेलगाव कुऱ्हे | वार्ताहर | Belgaon Kurhe नाशिक अन्न व औषधे प्रशासन विभागाच्या पथकातील अधिकाऱ्यांना गोंदे दुमाला (Gonde Dumala) येथील मे. ग्लोबल टोबॅक लेगसीच्या...