नाशिक | Nashik
गोवर्धन शिवारात भरधाव वेगाने इनोव्हा चालवत मद्यपी चालकाने एकाचा बळी घेतल्याप्रकरणी आज (मंगळवारी)
आमदार सीमा हिरेंनी विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला. रक्ताचे नमुणे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यास पोलिसांकडून दिरंगाई का करण्यात आली. तसेच संबधित गुन्ह्याचे चार्ज शिट वेळेत न्यायालयात का सादर करण्यात आली नाही? असा सवाल करत आमदार हिरेंनी (MLA Seema Hiray) अधिवेशनात ग्रामीण पोलिस प्रशासनाचा सावळा गोंधळ उघड केला.
तपासणीसाठी रक्ताचे नमुने वेळेत प्रयोगशाळेत न पाठविल्याने मद्यपी आरोपीस लगेचच जामीन मिळाल्याचे स्पष्ट झाल्याने हवालदारास निलंबित केल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर (Minister Pankaj Bhoyar) यांनी दिली. यापुढील चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती भोयर यांनी तारांकित प्रश्नांला उत्तर देतांना दिली आहे.
काही महिन्यांपूर्वी कमलेशकुमार वर्मा हा इसम केटरिंगचे काम संपवून घरी जाण्यासाठी सुलावाईन ते गोवर्धन रोडवरील पांपस्पिग हॉलच्या समोर उभा होता. या दरम्यान समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या इनोव्हा कारने वर्मा यांना जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिसांनी (Nashik Police) यश सतीश खैरनार या मद्यपी चालकास अटक केले होती. परंतु, तपासणीसाठी रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यास हवालदार दीपक पाटील यांनी दिरंगाई केल्याने आरोपीस लगेच जामीन मिळाला होता.यामुळे शहरवासीयांच्या मनात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. यातूनच आज आमदार हिरे यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
दरम्यान, सदरच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी गंभीर दखल घेतली असून, रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात दिरंगाई केल्याप्रकरणी हवालदार दिपक पाटील यास कालच निलंबित केल्याची माहिती गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधिमंडळात दिली. तसेच या प्रकरणाची सविस्तर चौकशी अजूनही सुरू असून, चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नसल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.





