नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आगामी सिंहस्थात (Simhastha) कोट्यवधींच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) प्रशासकीय पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. साधुग्राम येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यंदा पहिल्यांदाच स्वतंत्र पोलिस उपायुक्तांची (डीसीपी) नेमणूक करण्यात येणार आहे. सोबतच, २०१५ च्या कुंभमेळ्यात भाविकांना १५ ते २० किलोमीटर करावी लागलेली पायपीट यंदा अंतर्गत पार्किंगमुळे अवघ्या ८ किलोमीटरवर (येणे-जाणे मिळून) आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
शहरात एका पर्वणीला सुमारे २ कोटी, तर संपूर्ण कुंभमेळ्यात ८ कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुरक्षेचा नवा ‘मास्टर प्लॅन’ जाहीर करण्यात आला. शहर पोलिसांनी (City Police) कायदा-सुव्यवस्था, वाहतूक व इतर मुद्द्यांनुसार सिंहस्थाकरीता केलेल्या नियोजनाची माहिती मंगळवारी (दि. ११) दिली. त्यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सिंहस्थ प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, पाेलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, किशोर काळे, चंद्रकांत गवळी, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके, माधव रेड्डी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यासह गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, पंचवटीचे निरीक्षक गजेंद्र पाटील, नाशिकरोडचे जितेंद्र सपकाळे, उपनगरचे जयंत शिरसाठ, वाहतूक युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे उपस्थित होते. तर, यंदा रामकुंड आणि गोदावरी नदीपात्र अरुंद असल्याने दुर्घटनाविरहीत कुंभमेळ्यासाठी यंदा गोदापात्रात (Godapatra) पहिल्यांदाच ‘वॉटर बॅरिकेडिंग’ची मात्रा अवलंबली जाणार आहे. साधुग्राम आणि वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र दोन उपायुक्त तैनात केले जाणार असून, मार्चपर्यंत त्यांच्या नियुक्त्या पूर्ण होणार आहेत.
३५ हजार पोलिसांचा बंदोबस्त
सुरक्षेत दुपटीने वाढ करण्यात आली असून तब्बल ३५ हजार २५५ पोलिसांचा ताफा तैनात असेल. यात एटीएस, आरएएफ, बीडीडीएस, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या विशेष तुकड्यांचा समावेश असेल. प्रत्यक्ष गर्दी नियंत्रणासाठी २७ उपायुक्त आणि ४४८ पोलिस निरीक्षक मैदानावर उतरतील.
मुद्दे
शटल बसचा आधार : शहरात खाजगी वाहनांना पूर्ण बंदी असेल. बाह्य वाहनतळांवरून भाविकांना स्नान घाटाच्या जवळ पोहोचवण्यासाठी ‘शटल बस’ची सेवा दिली जाईल.
अशी असेल पायपीट : अंतर्गत वाहनतळापासून स्नान घाटापर्यंत भाविकांना ५०० मीटर ते ४.१ किलोमीटर (एका बाजूने) पायी चालावे लागेल.
रामकुंडावर विशेष निर्बंध : पर्वणीच्या मुख्य दिवशी रामकुंडावर केवळ साधू-महंतांनाच प्रवेश दिला जाईल.
रेल्वे अन् अन्नधान्य नियोजन : पर्वणीच्या दिवशी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर केवळ ‘स्पेशल ट्रेन’ थांबवण्याचा विचार असून शहरात अत्यावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवला जाईल.




