नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक ग्रामीण पोलीस दलातील (Nashik Rural Police Force) ३८० जागांसाठी तब्बल ९६ हजार ९०० अर्ज दाखल झाल्याने भरती प्रक्रियेची स्पर्धा यंदा उच्चांकावर पोहोचली आहे. शिपाई, वाहन चालक आणि कारागृह पोलिस शिपाई पदांसाठी २१ फेब्रुवारीपासून मैदानी चाचण्यांना सुरुवात होत असून, उमेदवारांसाठी स्पष्ट सूचना देत ‘स्पाइक शूज’ वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ साधे स्पोर्ट्स शूजच ग्राह्य धरले जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाने जाहीर केले. उच्च स्पर्धा, कडक निकष आणि स्पष्ट नियमावली यामुळे यंदाची ग्रामीण पोलिस भरती लक्षवेधी ठरणार आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, ग्रामीण दलात २१० शिपाई, ५२ चालक आणि कारागृह विभागात ११८ शिपाई अशी एकूण ३८० पदे भरली जाणार आहेत. अर्जाची संख्या पाहता सरासरी प्रत्येक जागेसाठी सुमारे २५० पेक्षा अधिक उमेदवार स्पर्धेत उतरले आहेत. सन २०२२ ते २०२५ या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्याउमेदवारांनाही यंदा विशेष संधी देण्यात आल्याने अर्जसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाली आहे.
राज्यभरातील इच्छुकांनी ग्रामीण भरतीकडे (Rural Recruitment) मोर्चा वळवला आहे. नाशिक शहरात सध्या रिक्त पदे नसल्याने तेथे भरती जाहीर झालेली नाही. ग्रामीण भागात होणारी ही भरती आगामी सिंहस्थ पर्वाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जाते. नव्याने नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना प्रशिक्षणानंतर पोलीस दलात समाविष्ट केल्यास कायदा-सुव्यवस्थेसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. २०२३ मध्ये १५० तर २०२४ मध्ये ३२ उमेदवारांची भरती झाली होती.
मैदानी चाचणीचे स्वरूप
१६०० मीटर धाव २० गुण (महिला : ८०० मीटर)
१०० मीटर धाव १५ गुण, गोळाफेक १५ गुण
शारीरिक पात्रता
उंची: महिला १५५ सेंमी, पुरुष १६५ सेंमी
छाती (पुरुष): ७९ सेंमी (न फुगवता) व ८५ सेंमी (फुगवून)





