नाशिक | प्रतिनिधी | Nashik
“ग्रह तुमच्या बाजूने आहेत आता गुंतवणूक केली तर धनवर्षाव होईल!” अशा गोड शब्दांत भविष्य सांगत भक्तांचा विश्वास जिंकणाऱ्या शरणपूर रोडवरील ‘अंजनीय ज्योतिष’ केंद्रातील संशयित ज्योतिषी सचिन देशमुख याने शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली उभारलेला कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार अखेर सायबर गुन्ह्यात (Cyber Crime) रूपांतरित झाला आहे. हमी परताव्याचे आमिष दाखवत त्याने शेकडो भाविकभक्तांचे कोट्यवधी रुपये लाटून कार्यालयाला कुलूप ठोकून पळ काढल्याची धक्कादायक बाब शरणपूर रोडवरुन समोर आली आहे.
शहर सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, एका किराणा व्यावसायिकाने १ एप्रिल २०२५ ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत देशमुखकडून ज्योतिष सल्ला घेतला. कौटुंबिक व व्यावसायिक अडचणींवर उपाय शोधताना त्याला देशमुखने ‘शेअर मार्केटमध्ये सुवर्णसंधी’ दाखविली. सुरुवातीला काही हजारांचा नफा दाखवत विश्वास संपादन केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने फिर्यादीने गुंतवणूक वाढविली आणि अखेर ती रक्कम तब्बल ७३ लाखांवर पोहोचली. विश्वास इतका पक्का झाला की संबंधित व्यावसायिकाने बँकेतून ‘व्यावसायिक कर्ज’ काढून ही गुंतवणूक केली. मात्र, काही महिन्यांत व्यवहार थांबले. कार्यालय बंद दिसताच संशय बळावला आणि थेट सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आली.
प्राथमिक तपासात देशमुखने दोन वर्षांपूर्वी शरणपूर रोडवरील एचडीएफसी बँकेजवळ (HDFC Bank) अंजनीय ज्योतिष केंद्र सुरू केले होते. येथे वैयक्तिक सल्ला, ग्रहदशा, वास्तू आणि आर्थिक भविष्य यावर मार्गदर्शन केले जात होते. त्याचवेळी ऑनलाईन प्लॅटफॉर्म, झूम मीटिंग आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ‘पॅरलल ट्रेडिंग’चे जाळे विणले. दरम्यान, वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे व पथकाने देशमुखचे कार्यालय सील करून झडती घेतली. त्यात, लॅपटॉप, संगणक, हार्डडिस्क, कोरे धनादेश व बँक कागदपत्रे आणि गुंतवणूकदारांची यादी व डिजिटल नोंदी जप्त केल्या आहेत. डिजिटल पुराव्यांचे फॉरेन्सिक विश्लेषण सुरू असून बँक व्यवहार गोठविण्याची प्रक्रिया सुरु आहे.
‘आध्यात्मिक विश्वास’ आणि ‘आर्थिक सापळा’
विशेष म्हणजे धार्मिक -आध्यात्मिक विश्वासाचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी करण्यात आल्याचे समोर आले असून ग्रहस्थिती अनुकूल”, “साडेसाती संपत आहे”, “धनयोग सुरू” अशा शब्दांनी गुंतवणुकदारांना मानसिकदृष्ट्या तयार केले जात होते. ग्रह-नक्षत्रांच्या आड शेअर बाजाराचा फसवा खेळ रचत विश्वासघात केल्याचे हे प्रकरण धोक्याची घंटा ठरले आहे. प्रतिष्ठित भागात उघडकीस आलेल्या या प्रकारानंतर, आता आणखी किती जण या ‘धनयोगा’च्या आमिषाला बळी पडले, याचा तपास सायबर पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
घोटाळा आणि व्याप्ती वाढणार
सध्या एक अधिकृत तक्रार नोंद तरी मौखिकरित्या संपर्क करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.फसवणुकीची एकूण रक्कम कोट्यवधींमध्ये जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. संशयितासह संभाव्य साथीदारांचा शोध सुरू आहे. ज्यांची याच स्वरुपात फसवणूक झाली आहे, त्यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुद्दे
- तक्रारदारांची संख्या वाढणार
- सध्या एक अधिकृत तक्रार दाखल
- एकूण फसवणूक रक्कम कोट्यवधींमध्ये जाण्याची शक्यता
- आणखी गुंतवणूकदार पुढे येणार
- सायबर पोलिसांशी, संपर्क व तक्रार करण्याचे आवाहन.
- भविष्य व ग्रहस्थितीच्या आधारे आर्थिक सल्ला
- लॅपटॉप, पीसी, कोरे धनादेश, कागदपत्रे जप्त




