नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कार्यकारी अभियंता (Executive Engineer) संवर्गातील महुओं बॅनर्जी याच प्रतिनियुक्तीने नाशिक मनपा सेवेत झालेली नियुक्ती नियमांचे उल्लंघन करून झाली असून ती त्वरित रद्द करण्यात यावी, अशी मागणी म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष तथा भाजप (BJP) नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी मनपा आयुक्तांना पत्र देऊन केली आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम ५३ अन्वये तांत्रिक संवगांतील कार्यकारी अभियंता पद शंभर टक्के पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे. २८ मार्च २०२५ रोजी ८ कार्यकारी अभियंता यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्यानुसार महुओं बॅनर्जी यांचेसाठी मनपाकडे (NMC) कुठलीही जागा रिक्त नसतांना त्यांना नियुक्ती देणे बेकायदेशीर आहे. ६ जून २०२३ च्या सेवाप्रवेश नियमानुसार कार्यकारी अभियंता (स्थापत्य) हे पद १०० टक्के पदोन्नतीचे असून पदोन्नती दिलेल्या अभियंत्यास पदभार देणे आवश्यक आहे.
कार्यकारी अभियंता या संवर्गातील पदोन्नती केलेली असून, या संवर्गातील कार्यकारी अभियंता उपलब्ध असतांना पुन्हा बॅनर्जी यांना ६ महिने उशिराने मनपा सेवेत वर्ग करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडुन सुरू आहेत. त्याला म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचा विरोध आहे.महापालिकेकडे कार्यकारी अभियंता पदासाठी सक्षम उमेदवार उपलब्ध न झाल्यास प्रतिनियुक्तीकरिता शासनाकडील समकक्ष पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव असावा, असा शासन निर्णय आहे.
दरम्यान, बॅनर्जी हे कार्यकारी अभियंता त्यांचे सेवाज्येष्ठता (Seniority) यादीनुसार ५ वर्षांचा अनुभव पूर्ण करीत नाही. त्यामुळे अहर्ता प्राप्त करत नसून त्यांना दिलेली नियुक्ती त्वरित रद्द करावी अन्यथा कर्मचारी संघटना आंदोलन करणार, असा इशारा पत्रकात देण्यात आला आहे.
मनपा अधिकाऱ्यांना संधी द्या – तिदमे
नाशिक महापालिके त परसेवेतील अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर सेवा संधी दण्यास शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी विरोध केला असून तसे पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना व मनपा आयुक्त मनीषा खत्री यांना दिले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना डावलून बाहेरील अधिकाऱ्यांना संधी देणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता महओं बॅनर्जी यांची नाशिक महापालिकेत (Nashik NMC) प्रतिनियुक्ती करण्याबाबत नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र बॅनर्जी यांच्याकडे आधीच महाराष्ट्र अभियांत्रिकी पर्यावरण प्रशिक्षण व संशोधन (मित्रा) कार्यालयाच्या अधीक्षक अभियंता तसेच संचालक या पदांचा अतिरिक्त कार्यभार
असल्याचे तिदमे यांनी निदर्शनास आणून दिले. स्थानिक अधिकाऱ्यांकडे सिंहस्थ कुंभमेळा व नाशिक शहरातील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यांना पदोन्नतीद्वारे संधी दिल्यास ते अधिक सक्षमतेने जबाबदाऱ्या पार पाडू शकतात. परसेवेतील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती म्हणजे स्थानिक अधिकाऱ्यांच्या हक्कावर गदा आणणे, असे तिदमे यांनी सांगितले.




