Wednesday, March 25, 2026
Homeनाशिकपडसाद : सर्वधर्मसमभावाची ऐसीतैसी!

पडसाद : सर्वधर्मसमभावाची ऐसीतैसी!

नाशिक | शैलेंद्र तनपुरेदै. देशदूत संपादक

आपल्या समाजात दांभिकपणा कसा अगदी शिगोशीग भरून राहिलाच याची प्रचिती वासनाकांडातील संशयित अशोक खरात प्रकरणी (Ashok Kharat Case) येत आहे. एकीकडे अशोक खरातच्या एकेक लीला बाहेर पडून सामान्य जनताही लज्जेने मान खाली घालत आहे. अशातच सध्या गल्लोगल्ली हिंदू संमेलनांची चलती सुरू आहे अशी संमेलने ही हिंदू जागराचा एक भाग असल्याचे सांगितले जाते. साहजिकच, त्याच्या आयोजनाला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, खरात प्रकरणात ज्या शेकडो महिलांचे शोषण झाले, त्या तर हिंदूच होत्या ना, पण मग त्यांच्यासाठी अशा संमेलनांमध्ये निषेधाचा साधा एक शब्दही निघू नये, तमाम हिंदू रक्षक, हिंदू शेरनी वगैरे उपाध्या लावून फिरणाऱ्या एकानेही या प्रकरणात अद्याप तोंड उचकलेले नाही. समस्त हिंदूंचा जणू ठेका घेतल्यागत सध्या नीतेश राणे वगैरे मंडळींचे जे वाक्ताडन चालत असते, ते पाहाता त्यांची या प्रकरणी दातखीळ का बसली असा प्रश्न पडतो. नाही म्हणायला, प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर चारपाच दिवसांनी राणेंनी तोंड उघडले आणि पीडित महिलांना न्याय देऊ असा शब्द दिला.

- Advertisement -

झाल्या प्रकरणाचा निषेधही जरुर केला. परंतु याच प्रकरणात जर संबंधित बुवाबाजी करणारा इतरधर्मीय असता तर अशा सगळ्या कथित हिंदू हितरक्षकांनी सारा देश डोक्यावर घेतला असता. दुर्दैवाने या प्रकरणात नीतेश राणे, संग्राम जगताप, आचार्य तुषार भोसले आदींनी अशोक खरात याने देवदेवतांच्या नावे केलेल्या फसवणुकीबद्दल, श्रद्धेचा बाजार मांडल्याबद्दल आणि असंख्य महिलांच्या भक्तीचा गैरफायदा घेत त्यांचे केलेले शोषण याविषयी निषेधाचा चकार शब्द काढलेला नाही. जणू या सगळ्यांना या विषयाशी काहीही घेणेदेणे नाही, इतर कोणत्याही प्रकरणात ही मंडळी कशी आगखाऊ भाषणे करतात हे समाज दूरचित्रवाणीवर पहात असतो. या विषयावरही त्यांची प्रतिक्रिया अपेक्षित होती. सगळ्याच धर्मात सडके मेंदू असतात, अशी संदिग्ध प्रतिक्रिया देऊन नीतेश राणेंनी किमान आपल्या हिंदू धर्मातही असे असू शकतात, याची कबुली दिली हे देखील खूप झाले. अशोक खरात याने जे काही केलेय, त्याला तर कोणत्याच अथनि क्षमा नाही. पण, तो केवळ एका विशिष्ट धर्माचा आहे, म्हणून अशा समाजकारणात महत्वाच्या व जबाबदार पदांवर असणाऱ्या मंडळींनी त्याच्या घाणेरड्या कृत्यांकडे केवळ आपद्धर्मीय म्हणून दुर्लक्ष करावे, हे अति झाले.

सिंहस्थ काळात नाशिकला (Nashik) येणाऱ्या भाविकांनी केवळ हिंदू दुकानदारांकडूनच खरेदी करावी, असा फतवाही मध्यंतरी त्यांनी नाशिकमध्ये येऊन काढला होता. संग्राम जगताप यांनीही अहिल्यानगरमध्ये असेच विधान केले होते. आचार्य अशी उपाधी लावलेले तुषार भोसले यांनीही या गंभीर प्रकरणावर आपले वाक्तुषार उडविण्याऐवजी रुपाली चाकणकर यांच्यावरच अधिक निशाणा साधला. चाकणकर बाईंनी आपल्या एका भाषणात भारतीय महिलापोथी पुराणात कशा अडकून पडल्या आहेत, त्यांनी सावित्रीच्या लेकी म्हणून वावरताना फुले-आंबेडकरांची तत्वे विचारात घ्यायला हवी असे विधान केले होते. खरात प्रकरणाचे बिंग फुटल्यानंतर याच आचार्यांनी चाकणकर बाईंच्या या पोथी पुराणासंदर्भातील विधान तेवढे महत्वाचे मानून टीका केली. उर्वरित खराताच्या लीलांविषयी ते जणू अनभिज्ञ होते. आचार्य म्हणतात, हिंदू महिला पोथी प्राणात रमतात म्हणूनच त्यांचे रक्षण होते, वगैरे. मांजर कशी कितीही उंचावरून पडली तरी नेमकी चार पायांवरच उभी राहते, तसे हल्ली राजकीय मंडळींचे झालेले आहे. अडचणीच्या मुद्यांनाही कशी बगल द्यायची हे यांच्याकडूनच शिकावे. खरात याची असीम भक्ती करणारे माजीमंत्री दीपक केसरकर यांनीही देवाच्या श्रद्धेमुळे खरात याच्याशी परिचय झाला, असे सांगितले.

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी तर सुरुवातीला भलताच सूर लावला. नंतर त्यांच्यावरच समस्त माध्यमे आणि विरोधी व स्वपक्षीय देखील तुटून पडल्यावर आपले सारे कुटुंबच खरातांना गुरुस्थानी मानते, त्यांचे व्यक्तिगत आयुष्यात काय चालले होते, याची आम्हाला कल्पना असण्याचे कारण नाही, अशी त्यांची भाषा होती. नंतर याच चाकणकर बाईंना हे सारे शोषण प्रकरण माहित असल्याचे व त्यांनी त्याकडे केवळ कानाडोळाच केला असे नाही तर हे प्रकरण बाहेर काढणाऱ्यांवर कशी पोलिसी कारवाईची धमकी दिली होती, हे देखील पुढे आले. तरीही बाईंचा तोरा काही कमी व्हायला तयार नाही. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आणि जेथे सुधारणावादी संतांच्या अफाट कार्यामुळे गेली चार-साडेचार शतके येथील भूमीत लोकांची मने धार्मिकदृष्ट्या सजग, सहिष्णू बनली, अशा प्रदेशात सध्या जे काही चालले आहे, ते विचारी मनांना कळणे कठीण आहे. आपले राष्ट्र जर खरेच बलवान वा शक्तिशाली बनवायचे असेल तर त्यासाठी राष्ट्रातील माणसांची मने सर्वाथनि भक्कम, सजग व सशक्त करावी लागतील. ते सोडून केवळ राष्ट्रगान गाऊन पण द्वेषाचे विष पेरून दुभंगच निर्माण होईल. दोषी वा लबाडपणा धर्मावरून ठरवावा लागणार असेल आणि त्यांच्यावरील कारवाईलाही धर्मकारणच चिकटणार असेल तर या देशाच्या सर्वधर्मसमभावालाच तिलांजली द्यावी लागेल.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपूरमध्ये भोंदूबाबा पोलिसांच्या रडारवर

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur भोंदूगिरीच्या वाढत्या घटनांमुळे समाजात चिंता व्यक्त होत असताना, अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या सीमारेषा...