वावी | वार्ताहर | Vavi
सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) दोडी बुद्रुक शिवारातील गणेश अण्णाजी आव्हाड यांच्या शेतामधील चंदनाचे झाड (Sandalwood Tree) कुऱ्हाड व करवतीच्या साहाय्याने तोडून चोरण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना सोमवारी (दि. १३) दुपारच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थांनी (Villagers) पकडले. यावेळी एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
आव्हाड यांच्या फिर्यादीवरून (Prosecutor) वावी पोलिसांनी (Vavi Police) हमीद खान हैदर खान (वय ४२) रा. अन्वी, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर, हल्ली रा. फर्दापूर एअरटेल कंपनी मोबाइल टॉवरजवळ, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर व कलीम सिकंदर पठाण रा. कोठरा बाजार, ता. भोकरदन, जि. जालना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दोडी शिवारात आव्हाड यांच्या शेतातील चंदनाचे झाड तोडण्याच्या तयारीत असतानाच त्यांच्या पत्नीने गणेश यांना माहिती दिली होती. त्यानंतर आजूबाजूचे शेतकरी जमा झाले. त्यानंतर दोघे संशयित दुचाकीवरून पळून जाण्याच्या तयारीत असताना ग्रामस्थांनी त्यांना पकडले. कलिम पठाण पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर हमीद खानला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. अजय महाजन पुढील तपास करीत आहेत.
दुचाकीसह साहित्य जप्त
संशयितांकडून चपट्या पात्याची लोखंडी कुन्हाड, दोन लोखंडी करवतीचे पाते, एक ९ इंच लांबीची गोल मंदण असलेली लोखंडी कुदळ तिचे एका बाजूने चपटे पाते, ११ इंच लांबीचे त्याच्या एका बाजूला गोल मंदण व दुसऱ्या बाजूला ब्रेड (आटे) असलेले टोक पिळदार आकाराचे गिरमिट, १३ इंच लांबीचे त्याचे एका बाजूला गोल मंदण व दुसऱ्या बाजूला थ्रेड (आटे) असलेले टोक पिळदार आकाराचे गिरमिट, लाल रंगाची हिरो होंडा कंपनीची अचिव्हर दुचाकी (क्र. एमएच १७ एक्यू ९५८६) असा ३० हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.