नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Election) गुरुवारी (दि. १५) होणाऱ्या मतदानाच्या (Voting) पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन पूर्ण केले आहे. मतदान केंद्राबाहेर उमेदवारांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करून कोणतेही शक्तिप्रदर्शन करू नये, असे स्पष्ट आदेश पोलिसांनी दिले आहेत. मतदान केंद्रात व परिसरात उमेदवारांसह केवळ अधिकृत प्रतिनिधींनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या निर्देशानुसार विशेष शाखेमार्फत बंदोबस्ताची आखणी करण्यात आली असून, स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ), होमगार्ड तसेच इतर जिल्ह्यांतील पोलिसांची अतिरिक्त कुमक शहरात दाखल झाली आहे. मंगळवारी (दि. १३) सायंकाळी पाच वाजेपासून सशस्त्र पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रे, स्ट्राँगरूम व प्रमुख चौकांचा ताबा घेण्यात येणार आहे. मतदान केंद्रांच्या आतील व बाहेरील परिसरासह शहरातील गल्लीबोळांतही नियमित गस्त घालण्यात येणार आहे. विशेषतः प्रमुख चौक व संवेदनशील भागात सशस्त्र पोलीस जवान तैनात असतील.
मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान काही मतदान केंद्रांबाहेर गर्दीचे प्रकार घडल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा पोलिसांनी मतदान केंद्राबाहेरील सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मतदान केंद्रालगत केवळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ओळखपत्र दिलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाणार असून, इतर कार्यकर्ते व समर्थकांनी केंद्र परिसरात थांबू नये, असे आवाहन पोलिसांनी (Police) केले आहे. मतदान प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर व परिसरात स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा व गोपनीय विभागाचे कर्मचारी गस्त घालतील. मतदान केंद्रालगत उमेदवारांनी अथवा कार्यकर्त्यांनी गर्दी केल्यास कारवाई केली जाईल. अनुचित घटना घडल्यास संबंधितांना ताब्यात घेण्यात येईल.
किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, गुन्हे
महत्त्वाचे मुद्दे
- शहरात कोणतेही संवेदनशील मतदान केंद्र नाही
- संवेदनशील भागात सशस्त्र पोलीस दल
- मतदान केंद्राबाहेर जमावास मनाई
- उमेदवार व कार्यकर्त्यांच्या हालचालींवर नजर
- मतदान केंद्रालगत गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई
- मतदान केंद्रात मोबाईल फोन नेण्यास सक्त मनाई





