नाशिक | प्रतिनिधी | Nashik
विधानसभा निवडणुकीनंतर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) तयारीने वेग घेतला आहे. त्र्यंबक नगर परिषदेने ५२२ कोटींचा विकास आराखडा सादर केला. पोलीस प्रशासनाने तब्बल १ हजार ११२ कोटींचा आराखडा जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांना सादर केला. पुढील बैठकीत इतर विभागदेखील त्यांचे आराखडे सादर करणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याचे सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सर्व विभागांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात मंगळवारी (दि.३) सिंहस्थ कुंभमेळा साप्ताहिक बैठक पार पडली
त्यावेळी विविध विभागांनी आराखडे सादर केले. सिंहस्थ सन २०२७-२८ ला होणार असून नाशिक मनपा, त्र्यंबकेश्वर नगर परिषद यजमान आहेत. येथे साधूमंहतांसह देश-विदेशातून हजारो भाविक व पर्यटक येणार आहेत. त्यामुळे पायाभुत सुविधांची महत्वाची जबाबदारी नाशिक मनपा व त्र्यंबक नगर परिषेवर आहे. या पर्वात कोणताही घातपात होऊ नये यासाठी सुरक्षेची जबाबदारी पोलीस (Police) यंत्रणेवर असणार आहे.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : महायुतीकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
मागील बैठकीत नाशिक मनपाने सात हजार कोटींचा विकास आराखडा सादर केला. बैठकीत त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी डॉ. श्रेया देवचके यांनी सुधारीत ५२२ कोटींचा आराखडा सादर केला. सिंहस्थ कालावधीतील नाशिक शहर, श्री क्षेत्र कावनई, सर्वतीर्थ टाकेद येथील प्रस्तावित रस्त्यांची कामे, जिल्ह्यातील विश्रामगृह इमारतींची कामे, भाविकांसाठी करावयाच्या सुविधा असा एकूण ४० कोटींच्या आराखड्याचे सादरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुधंती शर्मा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे यांनी केले.
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचा सिंहस्थविषयक १,११२ कोटींचा आराखडा पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी सादर केला. त्यात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, क्रेन, ड्रोन कॅमेरे, तात्पुरत्या पोलीस चौकी, वाहने आदी खर्चाचा समावेश आहे. महावितरण वितरण विभागाचा आराखडा अधीक्षक अभियंता डी.एच. पडळकर यांनी सादर केला. नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने यंत्रणांनी आरखडा सादर करताना आवश्यक सर्व बाबींचा समावेश करावा व परस्पर समन्वयातून सुक्ष नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकाऱ्याना दिल्या.
हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड
दरम्यान, यावेळी मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, प्रदीप चौधरी, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्य अधिकारी डॉ. श्रेया देवचके, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पोलीस आराखडा
सीसीटीव्ही कॅमेरा – ४०० कोटी
कार्यालयीन खर्च – २० कोटी
फूड पॅकेट – १० कोटी
वाहन खरेदी ३५ कोटी
पोलीस चौकी – २० कोटी
तात्पुरते हॉस्पिटल – ३ कोटी
ड्रोन कॅमेरे – १५ कोटी
क्रेन भाडे खरेदी ५ कोटी
अत्यावशक व्यवस्थापन २० कोटी
गुप्त वार्ता घटक ८.५३ कोटी