नाशिक | Nashik
ग्रामविकासाला चालना देणे आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाश्वत जलव्यवस्थापनाबाबत जनजागृती व ग्रामपातळीवरील नियोजनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वतीने उद्या (रविवार) नाशिक (Nashik) येथील मोदी ग्राउंडवर ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान – सन्माननीय लोकप्रतिनिधींचा महाकुंभ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास सुमारे १० हजार सरपंच, ग्रामस्थ, ग्रामसेवक आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६’चा बक्षीस वितरण समारंभ तसेच ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० (२०२६-२७)’चा शुभारंभ करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा (Grampanchyat) गौरव करण्यात येणार असून, आदर्श सरपंचांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
सरपंच परिसंवाद
कार्यक्रमांतर्गत ‘सरपंच परिसंवाद – दुष्काळावर मात, जलसमृद्ध गावाचा संकल्प’ आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात भूगर्भातील जलसाठ्याचे संवर्धन, उपलब्ध पाणीसाठ्याचा परिणामकारक वापर, भूजल पातळीत वाढ, जलसंधारण आणि दुष्काळी परिस्थितीचे व्यवस्थापन या विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच गावपातळीवर पाण्याचे नियोजन करताना ‘वॉटर बजेट’ तयार करणे, पावसाच्या पाण्याची साठवणूक करणे आणि उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पाण्याबाबत जनजागृती करणार
दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर नियोजनबद्ध उपाययोजना करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने गावातील पाण्याची उपलब्धता, साठवणूक, पाण्याची गरज आणि भविष्यातील नियोजन यांचा विचार करून जलव्यवस्थापनाची प्रभावी कार्यपद्धती विकसित करण्यावर परिसंवादात भर दिला जाणार आहे. जलसंधारण, पाणी बचत, भूजल पुनर्भरण, चारा पुरवठ्याचे नियोजन आणि पाण्याबाबत जनजागृती या विषयांचाही यामध्ये समावेश असेल.
सुरक्षा व्यवस्थेचे चोख नियोजन
पाहणीदरम्यान कार्यक्रमस्थळावरील व्यवस्था, पार्किंग, उपस्थितांची ये-जा आणि आवश्यक सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. ग्रामपंचायतींच्या विकासकामांना प्रोत्साहन देणे, लोकप्रतिनिधींना ग्रामविकासाच्या विविध बाबींवर मार्गदर्शन करणे आणि जलसंधारण व पाणी व्यवस्थापनासाठी ग्रामस्तरावर प्रभावी नियोजन घडवून आणणे, या दृष्टीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पुढील टप्प्याच्या शुभारंभासह ग्रामविकास आणि जलसमृद्ध गावांच्या निर्मितीसाठी या कार्यक्रमातून दिशा मिळणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी
कार्यक्रमाच्या नियोजनाचा ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जिल्हास्तरीय यंत्रणेच्या सातत्यपूर्ण संपर्कात राहून आढावा घेतला, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी कार्यक्रमाच्या तयारीचे नियोजन व समन्वय साधत विविध व्यवस्थांची पाहणी केली.




