नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात शासकीय विकासकामांचे व टेंडरचे वारे वाहू लागले असतानाच, जुन्या टेंडर फसवणुकीच्या (Fraud) गुन्ह्यांचे भूत पुन्हा मानगुटीवर बसताना दिसत आहे. पोलीस मुख्यालयातील जीर्ण चाळी आणि इमारती पाडण्याचे कंत्राट मिळाल्याचे भासवून एका व्यावसायिकाला तब्बल १२ लाख २० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) धुळ्यातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सिंहस्थाच्या तोंडावर पुन्हा एकदा टेंडर रॅकेट सक्रिय तर झाले नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सुरेश दिनकर कापसे (वय ४२, रा. मेहेरधाम स्टॉप, पेठ रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित विनय सुरेश शेवाळे (रा. परेजपूर, ता. साक्री, जि. धुळे) आणि पाटील (पूर्ण नाव-पत्ता अज्ञात, रा. नाशिक) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जून २०२० ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संशयित विनय शेवाळे व पाटील यांनी फिर्यादी कापसे यांच्याशी संपर्क साधला. आम्हाला शहर पोलीस मुख्यालयातील (Police Headquarters) जुन्या व जीर्ण इमारती पाडण्याचे काम (टेंडर) मिळाले आहे, असा बनाव त्यांनी रचला. हे कंत्राट तुम्हाला मिळवून देतो, असे आमिष दाखवून संशयितांनी त्र्यंबक रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या आवारात दोन साक्षीदारांसमक्ष १२ लाख २० हजार रुपये रोख स्वरूपात स्विकारले.
दरम्यान, पोलीस मुख्यालयातील जीर्ण इमारती पाडून त्याचे रॉ-(भंगार) मटेरियल विकण्याचे ऑनलाईन टेंडर दुसऱ्याच एका व्यक्तीला मिळाल्याचे कापसे यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी शेवाळे याच्याकडे रकमेसाठी तगादा लावला. यावर संशयितांनी नोटरी समजूतपत्र, उसनवार पावती देऊन कापसे यांना १२ लाख २० हजारांचे धनादेश दिले. मात्र, ते खात्यात पुरेसे पैसे नसल्याने बाऊन्स झाले. तब्बल सहा वर्षे पाठपुरावा करूनही पैसे परत न मिळाल्याने अखेर कापसे यांनी पोलिसांत धाव घेतली. सरकारवाडा पोलिसांनी (Police) गुरुवारी गुन्हा नोंदवला आहे. तपास सहाय्यक उपनिरीक्षकशरद सोनवणे करत आहेत. दोन्ही संशयितांचा शोध सुरु आहे.
जुने रॅकेट रडारवर?
नाशिकमध्ये यापूर्वीही सिंहस्थ कुंभमेळा विकासकामांच्या टेंडरच्या नावाने गैरप्रकार उघडकीस आले होते. जळगाव व धुळे येथील काही संशयितांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या, शिक्के आणि बोगस कागदपत्रे तयार करून कोट्यवधींच्या बनावट टेंडरचे रॅकेट चालवल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सिंहस्थ विकासकामांच्या नावाखाली धुळे-जळगाव कनेक्शने नाशिकमध्ये पुन्हा पाय पसरले आहेत का? तसेच पोलीस मुख्यालयासारख्या संवेदनशील ठिकाणच्या कामाचे आमिष दाखवून पीडब्लूडी कार्यालयाच्या आवारातच रोख रक्कम उकळण्यामागे शासकीय यंत्रणेतील कोणाचे अभय तर नाही ना? असा अँगल तपासाच्या चक्रात आला आहे.




