ओझे | विलास ढाकणे
सध्या दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) ‘ऑक्टोबर हिट’चा पारा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. तीव्र उष्णतेमुळे पंखे, एसी आणि कुलर्सचा वापर कमालीचा वाढला आहे. त्यातच विहिरी व बोअरवेलवरून शेतीसाठी (Farm) पाणी उपसण्याकरिता ईलेक्ट्रिक मोटर्सचा वापर वाढल्याने, तसेच औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रातील विजेची मागणी वाढल्याने विजेच्या मागणी-पुरवठ्याचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. वाढत्या ओव्हरलोडच्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून तासनतास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, शेतकरी व व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
महावितरणची तारेवरची कसरत
एकीकडे वाढती थकबाकी आणि दुसरीकडे ग्राहकांकडून (Customer) होणारी अखंडित विजेची मागणी, यामुळे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. त्यातच दिंडोरी ते वणी या १८ किलोमीटर अंतरावरील प्रमुख विद्युत वाहिनी कालबाह्य झाल्याने रात्री-अपरात्री तांत्रिक बिघाड होऊन वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिंडोरी येथील १३३ केव्ही केंद्रातून वणी येथील ३३ केव्ही सबस्टेशनला वीज दिली जाते; जिथून वणी, मावडी, तळेगाव, तिसगाव, पांडाणे, नांदुरी, चंडिकापूर, ओझरखेड यांसह ३६ गाव पाणी पुरवठा योजना व पश्चिम पट्ट्याला वीजपुरवठा होतो. मात्र, या सर्वच भागांना सध्या वारंवार खंडित होणाऱ्या विजेचा सामना करावा लागत आहे.
नवीन सबस्टेशन सुरू होऊनही समस्या कायम
देवसाने (Devsane) येथे २२० केव्हीचे नवीन सबस्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर कोशिंबे, पिंपरी अंचला व परिसरातील विजेची समस्या सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र, हे केंद्र सुरू होऊनही कमी व्होल्टेजचा पुरवठा होत असल्याने समस्या कायम आहे. तसेच, थकीत वीजबिलाच्या वसुलीबाबत महावितरण दुजाभाव करत असल्याचा आरोपही ग्राहकांकडून केला जात आहे. सामान्य ग्राहकांचे एक महिन्याचे बिल थकल्यास वीज कापली जाते, तर मोठ्या थकबाकीदारांवर मेहेरनजर का दाखवली जाते, असा सवाल उपस्थित करत वरिष्ठांनी याची चौकशी करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
सण-उत्सवांच्या काळात तरी सुरळीत पुरवठा द्या!
सध्या नवरात्र, कोजागिरी पौर्णिमा, दसरा आणि दिवाळी असे एकापाठोपाठ एक सण-उत्सव येत आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणने किमान सणांच्या दिवसांत तरी वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.
महावितरणचे म्हणणे काय?
विद्युत पुरवठा करणाऱ्या पारेषण लाईनमध्ये वारंवार येणारे तांत्रिक बिघाड आणि सध्या सुरू असलेली दुरुस्तीची कामे यामुळे काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत. या दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य दिले जात असून, लवकरच वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.




