नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महत्त्वाच्या आणि आनंददायी सणांपैकी एक असलेला, असत्यावर सत्याचा, अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला (Shardiya Navratri) आजपासून प्रारंभ होत आहे. घटस्थापनेपासून नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा जिल्हाभर जल्लोष व उत्साह पाहायला मिळणार आहे. अनेक दुर्गादेवी मंडळे देवीच्या उत्सवासाठी सज्ज झाले आहेत.
घरोघरी घटस्थापनेची तयारी पूर्ण झाली आहे. आजपासून नऊ दिवस देवीची पूजा, आरती, गरबा असे भरगच्च कार्यक्रम होणार आहे. कालिका देवी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी होणार आहे. दहा दिवस यात्रेने परिसर गजबजून जाणार आहे. नवरात्रोत्वाच्या निमित्ताने बाजारात (Market) मोठे चैतन्य निर्माण झाले आहे. फळे व फुलांची बाजारपेठ बहरली आहे.
शहरात ग्रामदैवत श्री कालिका माता देवस्थान, प्राचीन दैवत श्री भद्रकाली देवस्थानासह सप्तश्रृंग गड, वणी गाव, चांदवड येथील श्री रेणुका माता मंदिर, येवला तालुक्यातील कोटमगाव येथील श्री जगदंबामाता देवस्थान या प्रमुख ठिकाणांसह जिल्ह्यातील विविध देवी मंदिरांमध्ये (Temple) नवरात्रोत्सव होणार आहे.
दरम्यान, बंगाली असोसिएशनतर्फे नाशिकरोड आणि गंगापूररोड या दोन्हीही ठिकाणी महाषष्ठी ते महादशमी, दसऱ्यापर्यंत या उत्सवात रंग चढणार आहे. या उत्सवात बंगाली प्रथेप्रमाणे श्री गणेश, भगवान कार्तिकेय, महादुर्गा-महासरस्वती आणि महालक्ष्मी या देवतांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
घटस्थापना मुहूर्त
अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीची सुरुवात २२ सप्टेंबर रोजी पहाटे १.२३ वाजता होणार आहे, तर या तिथीची समाप्ती २३ सप्टेंबर रोजी पहाटे २.५५ वाजता होईल. घटस्थापना हा नवरात्रीच्या पूजेतील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यंदा घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त सकाळी ६.०९ ते ८.०६ वाजेपर्यंत असेल. या शुभ मुहूर्तात घटस्थापना करणे फलदायी ठरेल. याशिवाय, अभिजित मुहूर्ताचा काळ सकाळी ११.४९ ते दुपारी १२.३८ पर्यंत राहील, असे पुरोहित प्रतीक जोशी यांनी सांगितले
घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य
घटस्थापनेला लागणारी काळी माती, पितळेचा तांब्या, आंब्याचे डहाळे, ओटीचे सामान, नारळ, विड्याची पाने, फुलांचा हार, दुर्वा, कापूर, धूप, अगरबत्ती, चुनरी, देवीची मूर्ती किंवा फोटो, कुंकू, हळद, तांदूळ, पाच प्रकारचे धान्य यांच्या विक्रेत्यांनी रविवार कारंजा परिसरात गर्दी केली होती.
नवरात्राचे नऊ रंग
२२ सप्टेंबर – पांढरा रंग
२३ सप्टेंबर- लाल रंग
२४ सप्टेंबर- निळा रंग
२५ सप्टेंबर- पिवळा रंग
२६ सप्टेंबर- हिरवा रंग
२७ सप्टेंबर- राखाडी रंग
२८ सप्टेंबर- केशरी रंग
२९ सप्टेंबर- मोरपंखी रंग
३० सप्टेंबर – गुलाबी रंग




