नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon
प्रसूतीगृहात प्रसूतीसाठी आलेल्या एका गरोदर महिलेला (Woman) काही वेळ बसून ठेवले. नंतर तिची फाइल बघून रक्त चेक करावे लागेल यासह आदी कारणे सांगून दिवसभर ताटकळत बसविले. त्यानंतर येथे प्रसूती होणार नाही, असे उत्तर डॉक्टरांनी (Doctor) महिलेच्या नातेवाईकांना देत रुग्णालय (Hospital) प्रशासनाने हाकलून लावण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामधरी येथून सोनाली आकाश मोरे (२०) हिला शनिवारी (दि.२१ ) रोजी सकाळी ६ वाजता प्रसूती कळा सुरु झाल्याने तिला प्रसूतीसाठी रुग्णालयात आणले असता प्रसूतीसाठी दाखल न करताच तिला रुग्णालयाच्या बाहेरच बसून ठेवण्यात आले. यानंतर रक्त चेक करावे लागेल यासह आदी कारणे सांगून तिला दिवसभर ताटकळत बसविले. तसेच सोनाली (Sonali) हिचे सीजर करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले.
यानंतर रुग्णालयाकडून सीजर करण्यासाठी आमच्याकडे फिजिशियन डॉक्टर नाहीत, असे कारण सांगून सोनाली हिला मालेगाव (Malegaon) येथे जाण्याचा सल्ला दिला. या गरोदर महिलेला रुग्णालयाकडून दिवसभर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर ऐकत नसल्याने शिंदेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक आणि युवासेना जिल्हाप्रमुख फहरान खान यांनी रुग्णालयात तात्काळ धाव घेत सर्व प्रकाराबाबत येथील डॉ. शांताराम राठोड यांच्याशी चर्चा करत असतांना त्यांना वार्डबॉय व डॉक्टर या दोघांनीही मद्यप्राशन केल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान यांनी प्रसुतीसाठी आलेल्या सोनाली आणि तिच्या कुटुंबाशी (Family) चर्चा केली. सर्व घटनाक्रम ऐकल्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले होते. यानंतर गरोदर महिलेची प्रसुतीकरण्यासाठी तात्काळ डॉ.हर्षद तुसे यांना बोलविण्यात आले. यानंतर रात्री १०.१५ वाजता सोनालीची नॉर्मल प्रसूती झाली असता तिला कन्यारत्न (Girl) प्राप्त झाले.
दरम्यान, नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी मुलीच्या संगोपनासाठी २१ हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. तर याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयाच्या विरोधात नांदगाव पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे आता नांदगाव ग्रामीण रुग्णालयातील (Nandgaon Rural Hospital) वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.




