घोटी | जाकीर शेख | Ghoti
इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) कांचनगाव परिसरातील (Kanchangaon Area) ठाकूरवाडी येथील गुरुवार (दि.३०) जानेवारीपासुन बेपत्ता (Missing) असलेल्या दोन तरुणींचा मृतदेह (Dead Body) भाम धरणाच्या (Bham Dam) पाणी सोडण्याच्या आऊटलेट जवळ आढळला असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कांचनगांव परिसरातील ठाकुरवाडी (Thakurwadi) येथील मनिषा भाऊ पारधी (वय १९ वर्ष) व सरीता काळु भगत (वय १८ वर्ष) या दोन तरुणी गेल्या ५ दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात (दि.३० रोजी) मिसिंग दाखल करण्यात आली होती. सोमवारी दुपारच्या सुमारास या मुलींचा मृतदेह गुरुदेव गोरख गिळंदे यांना आढळून आल्याने त्यांनी घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station) खबर दिली.
यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन रमेश शंकर गांगड, राहणार ठाकुरवाडी, कांचनगाव, देविदास निवृत्ती केवारे, अंकुश संतू भगत, ज्ञानेश्वर काळू गिळंदे, मदन बिन्नर व शेणवडचे सरपंच कैलास लक्ष्मण कडू सरपंच शेनवड बुद्रुक यांच्या मदतीने पाण्यातून मृतदेह बाहेर काढले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात (Ghoti Rural Hospital) पाठवण्यात आले.
दरम्यान, याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची (Death) नोंद करण्यात आली आहे. तर आत्महत्या की घातपात याबाबत संशय कायम असून पोलिसांच्या तपासानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. याबाबत पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय कौटे, पोलीस हवालदार भानुदास बिन्नर, पोलीस शिपाई केशव बस्ते हे पुढील तपास करीत आहे.