नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकमध्ये (Nashik) सिंहस्थाच्या (Simhastha) पूर्वतयारीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धर्मध्वज मिरवणूक, ध्वजारोहण सोहळा आणि गोदा आरती या महत्त्वाच्या धार्मिक कार्यक्रमांसाठी शहर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. रामकुंड व संपूर्ण घाट परिसरात व्हीव्हीआयपी, साधू-महंत आणि भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेने निर्देश जारी केले आहेत. ३० आणि ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीत बदल करण्यात आले असून, अनेक मार्ग नो व्हेईकल झोन असणार आहेत.
पोलिसांच्या (Police) अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा (१९८८) आणि मुंबई पोलीस अधिनियम (१९५१) मधील तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तरी नाशिककरांनी आणि भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत गवळी व सहाय्यक आयुक्त माधव रेड्डी यांनी केले आहे.
३० ऑक्टोबरला धर्मध्वज मिरवणूक
सकाळी ६:०० वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत तपोवन मैदान, आठवण लॉन्स, टी कॉर्नर, तपोवन कॉसिंग, पंचमुखी हनुमान मंदिर, काट्या मारुती चौक, देवी चौक (अमरधाम रोड), गणेशवाडी, फुल बाजार, गाडगे महाराज पूल, दिल्ली दरवाजा, नेहरू चौक, धुमाळ पॉईंट, मेनरोड, रविवार कारंजा, अहिल्याबाई होळकर पूल, मालेगाव स्टँड ते रामकुंड असा मार्ग असेल (मिरवणुकीतील वाहने वगळून).
इतर बंद मार्ग : अशोक स्तंभ ते रविवार कारंजा, रेडक्रॉस ते धुमाळ पॉईंट, मालेगाव स्टँड ते मखमलाबाद नाका, आणि दिंडोरी नाका ते मालेगाव स्टँड हे मार्ग सर्व वाहनांसाठी बंद राहतील.
पर्यायी मार्ग : वाहनचालकांसाठी दिंडोरी नाका-पेठ नाका सिग्नल-मखमलाबाद नाका-गोदा पार्क-गजभिये पेट्रोल पंप मार्गे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
३१ ऑक्टोबर : ध्वजारोहण व गोदा आरती
दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजेपासून रात्री १२:०० वाजेपर्यंत रामकुंडाकडे जाणारे सर्व मार्ग नागरिक व वाहनांसाठी बंद राहतील.
प्रमुख बंद मार्ग : अशोकस्तंभ-रविवार कारंजा-अहिल्यादेवी होळकर पूल-मालेगाव स्टँड-इंद्रकुंड-पंचवटी कारंजा, मखमलाबाद नाका ते रामकुंड-कपालेश्वर मंदिर, तसेच गाडगे महाराज पूल व रामसेतू पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद असेल.
नो व्हेईकल झोन
वरील सर्व प्रवेश बंद मार्ग, नो-पार्किंग झोन आणि नागरिकांचे पायी चालण्याचे सर्व मार्ग नो व्हेईकल झोन घोषित करण्यात आले आहेत. आपत्कालीन वाहने (रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशामक दल व पोलीस वाहने) यांना हे नियम लागू असणार नाहीत.
भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था
नागरिकांच्या सोयीसाठी पंचवटी आणि भद्रकाली बाजूस विविध वाहनांसाठी पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत:
पंचवटी बाजू : शिंदे मळा, श्रद्धा लॉन्स, आणि गौरी पटांगण.
भद्रकाली बाजू : छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, बी.डी. भालेकर मैदान, आणि संभाजी महाराज गार्डन.




