पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
नाशिक शहरातील रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे (Potholes) आतापर्यंत पाच नागरिकांचा मृत्यू (Citizen Death) झाल्याच्या घटना घडूनही संबंधित यंत्रणा अद्यापही गंभीर झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अशातच मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अमृतधाम चौफुली येथे सुरू असलेल्या रस्ते कामादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पुन्हा एक अपघात (Accident) घडला असून, त्यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ४) मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) शहापूरजवळ खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात एका जवानाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर एका पोलीस कर्मचाऱ्याने मृत जवानाच्या कुटुंबीयांना विचारलेल्या असंवेदनशील प्रश्नाची राज्यभर चर्चा झाली होती. त्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईचे निर्देश दिले होते. मात्र, या घटनेनंतरही नाशिकमधील रस्ते कामांमध्ये सुरक्षेबाबत आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र कायम आहे.
अमृतधाम चौफुली येथे रस्त्याचे काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराने आवश्यक बॅरिकेड्स, धोक्याचे इशारा फलक, रात्रीच्या वेळी दिसणारे रिफ्लेक्टर्स किंवा इतर सुरक्षा व्यवस्था उभारलेली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पावसामुळे रस्त्यावर तयार झालेल्या खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वाराचा ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात कुणाल महाले (रा. लामखेडे मळा) आणि प्रभाकर माने (रा. साईनगर) हे गंभीर जखमी झाले. दोघेही तारवाला नगरकडून अमृतधामच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडला. त्यांच्या चेहऱ्यावर व शरीरावर गंभीर दुखापती झाल्या असून त्यांना तातडीने लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
दरम्यान, नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतरही संबंधित ठेकेदारांवर कठोर कायदेशीर कारवाई होत नसल्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अपघातानंतर चालकांवर जबाबदारी ढकलण्यापेक्षा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या आणि सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
अमृतधाम चौफुली येथील अपघातास कारणीभूत ठरलेल्या संबंधित ठेकेदारावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा. जखमी नागरिकांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च ठेकेदाराकडून वसूल करावा. तसेच महामार्गावरील अपूर्ण कामे, धोकादायक खड्डे २४ तासांच्या आत बुजवून आवश्यक बॅरिकेड्स, इशारा फलक आणि सुरक्षा व्यवस्था उभारावी.
प्रियंका माने, नगरसेविका




