त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar
सध्या पितृपक्ष चालू असल्याने या काळात राज्यासह देशभरातून भाविक मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे पितृकर्म व धार्मिक विधींसाठी येतात. शनिवार-रविवार लागोपाठ सुट्ट्या आल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. यामुळे मंदिर परिसरात गर्दीचे नियोजन करताना प्रशासनावर ताण येत असून, सर्वसामान्य भाविकांना सुलभ दर्शन मिळावे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान (Trimbakeshwar Devsthan Trust) ट्रस्टने मोठा निर्णय घेतला आहे.
गर्दीच्या काळात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि दर्शन व्यवस्था अधिक सुरळीत ठेवण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने दि. ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सर्व प्रकारचे व्हीआयपी दर्शन बंद (VIP Darshan Closed) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या संदर्भात देवस्थान ट्रस्टने एक पत्रक काढले आहे. या पत्रात केंद्र शासन, राज्य शासन अथवा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्राप्त होणार्या राज्य शिष्टाचारासंबंधीच्या लेखी पत्रव्यवहारानुसार असलेल्या अपवादांना हा निर्णय लागू राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या निर्णयाचा मुख्य उद्देश म्हणजे वाढत्या गर्दीचे योग्य नियोजन करणे, सामान्य भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे आणि मंदिरातील दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवणे हा असल्याचे देवस्थान ट्रस्टने स्पष्ट केले आहे. भाविकांनी या निर्णयाची नोंद घेऊन मंदिर (Temple) प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
त्र्यंबकमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी
गेल्या दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये वाहनचालकांसह नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शहरातील भाविकांसह वाहनांच्या वाढलेल्या गर्दीमुळे पादचार्यांसह दुचाकी चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्र्यंबकेश्वर बस स्थानक ते गजानन महाराज संस्थानपर्यंत सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणवर वाहतुकीचा बोजवारा उडालेला पाहायला मिळत आहे. ही वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पोलिसांचे योग्य सहकार्य मिळत नाही असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.




