नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिका निवडणुकीची (NMC Election) चाहूल लागताच सर्वच समाज घटकांत राजकीय हालचालींना वेग आला आहे. अल्पसंख्याक समाजातील (Minority Community) राजकीय इच्छुकही सक्रिय झालेले दिसत आहेत. २०१७ मध्ये भाजपकडून प्रभाग २३ मधून शाहीन सलिम मिर्झा निवडून आल्या होत्या. त्यामुळे यंदा भाजपकडे अल्पसंख्याक इच्छुकांची गर्दी वाढल्याचे दिसत आहे. स्थानिक प्रश्न, विकासकामांचा वेग, तसेच राजकीय प्रतिनिधित्वाचा मुद्दा या कारणांमुळे मुस्लीम समाजात प्रभागनिहाय उमेदवारीसाठी उत्सुकता वाढली आहे.
भारतीय जनता पक्षाकडे (BJP) विविध प्रभागांतून इच्छुक अर्ज दाखल करत आहेत. शाहीन मिर्झा किंवा त्यांचे पुत्र मुजम्मील मिर्झा पुन्हा प्रभाग २३ मधून इच्छुक आहेत, नवाब जागिरदार प्रभाग १३ तर अल्पसंख्याक भाजप शहरप्रमुख रफीक शेख व महिला उमेदवार रिजवाना सय्यद प्रभाग ३०, मुफद्दल पेंटर १५ तर फिरोज शेख व हनिफ शेख हे प्रभाग १४ मधून इच्छुक आहेत. शाहीन मिर्झा मागच्या वेळी पहिल्यांदाच निवडून आल्या व मनपात भाजपची एकहाती सत्ता आली. मिर्झा यांनी प्रभाग विविध ठिकाणी सभागृह तयार केले तर रस्ते, उद्यान, वृक्षारोपण, ग्रीनजिम, स्वच्छता आदींकडे लक्ष दिल्याने मुस्लीम समाजात त्यांच्या व भाजपबद्दल एक वेगळी आणि सकारात्मक चर्चा सुरू झाली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) देखील भाजपच्या आ. देवयानी फरांदे यांना त्याचा फायदा झाल्याचे बोलले जाते. भाजप हा मुस्लीम विरोधी पक्ष असल्याचा आरोप विरोधी करीत असले तरी सध्या भाजपबाबत मुस्लीम समाज सकारात्मक दिसत आहे. जुने नाशिकसह शहरातील अनेक प्रभागांत पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वाहतूककोंडी, सार्वजनिक सोयीसुविधांची कमतरता अशा मूलभूत प्रश्नांचा विषय वारंवार पुढे येत आहे. गेल्या काही वर्षांत अनेक विकासकामांना वेग मि ळाल्याचे चित्र असले तरी काही प्रभागांत अद्याप अपेक्षित कामे झालेली नाहीत.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नेतृत्व सक्षम असावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत. त्यामुळेच मुस्लिम बहुल भागात उमेदवारीची मागणी करणारे इच्छुक स्वतःच्या प्रभागातील प्रश्न सोडवण्याच्या आश्वासनावर भर देत आहेत. २०१७ नंतर मुस्लीम नगरसेवकांची संख्या वाढावी, अशी अपेक्षाही मुस्लीम समाज व्यक्त करतो. भाजपकडूनदेखील अल्पसंख्याक मोर्चाच्या माध्यमातून मुस्लीम समाजाशी संवाद वाढवण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळेच या निवडणुकीत भाजपकडून मुस्लीम समाजातील काही उमेदवारांना संधी मिळू शकते. मुस्लीम मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वच पक्ष या समाजातून उमेदवारांना संधी देण्याच्या तयारीत आहेत. भाजपकडे वाढती उमेदवारीची मागणी वाढत्या स्वीकाराची आणि बदलत्या राजकीय समीकरणांची साक्ष देत आहे.
निवडणुकीआधीच माघारीचे नियोजन
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रभागनिहाय मतदार याद्यांवर सध्या सर्व पक्षांनी अभ्यास सुरू केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुमारे ८६ हजार दुबार नावे आढळल्याची चर्चा आहे. मतदारयाद्यांतील या त्रुटींमुळे अनेक प्रभागांत नवीन राजकीय गणित तयार होताना दिसत आहे. “उद्या निवडणुका लागल्या तर माझ्यासमोर कोण उमेदवार घेऊ शकतो?” या प्रश्नाने काही इच्छुकांचे टेन्शन वाढले असून, प्रतिस्पर्धी उमेदवाराला माघार घ्यायला कोण सक्षम नेता किंवा कार्यकर्ता प्रभाव टाकू शकतो, याचा शोध काही जणांनी आत्तापासूनच सुरू केला आहे. यामुळे अंतर्गत राजकारणाला चांगलाच ऊत येत असून, निवडणुकीआधीच माघारीचे नियोजन सुरू झाल्याच्या चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत.
सात जागांची मागणी
भाजप अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी नाशिक दौऱ्यावर आले असता आम्ही शहरात अल्पसंख्याक विभागाच्या लोकांसठी ७ जागांची मागणी केली आहे. आता पक्ष जो निर्णय देईल त्यानुसार काम होणार.
रफीक शेख, शहराध्यक्ष, अल्प. भाजप, नाशिक




