नाशिक | प्रतिनिधी | Nashik
स्वतंत्र निवडणूक लढणाऱ्या भाजपला (BJP) मनपात स्पष्ट बहुमत असतांना त्यांनी शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादी अजित पवार गटाला सत्तेत सामील होण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यात सत्तापदांची वाटणी न केल्याने सेनेने तो प्रस्ताव स्वीकारलेला नाही. तर काल सेनेच्या चार नगरसेवकांनी थेट महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज नेल्याने महापालिका सत्ता संघर्षात नवा ट्विस्ट आला आहे.
दरम्यान, सेनेच्या (Shivsena) स्थानिक नेत्यांनी मनपा सत्तेबाबतचा संपूर्ण अहवाल मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) व आ. सुहास कांदे यांना सोमवारी (दि.२) दिला आहे. तर सत्तेत सहभागी होणार का विरोधात बसणार? याबाबतचा अंतिम निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) घेणार असल्याची माहिती पक्षाचे उपनेते व मनपातील गटनेते अजय बोरस्ते यांनी दिली.
नाशिक महापालिकेतील (Nashik NMC) सत्तास्थापनेचा पेच दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचा होत असताना आता या राजकीय संघर्षात नवा ट्रिस्ट निर्माण झाला आहे. भाजपने महायुतीच्या नावाखाली शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाला दिलेल्या प्रस्तावात सत्तेतील पदांचा कोणताही समावेश नसल्याने शिवसेना शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. तर सोमवारी सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विलास शिंदे यांच्यासह रंजना बोराडे, सुवर्णा मटाले व राहुल दिवे यांनी प्रत्येकी दोन म्हणजे महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज नेल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
महापालिकेत सत्तास्थापनेसाठी भाजपने दोन्ही मित्रपक्षांना ‘बिनअटी’ एकत्र येण्याचे निमंत्रण दिले आहे. मात्र, या प्रस्तावामध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती किंवा इतर सत्तेतील पदांबाबत कोणतीही स्पष्ट हमी नसल्याचे समोर आल्याने शिंदे गटात (Shivsena Shinde Gorup) अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिंदे गटाच्या नगरसेवकांच्या संख्येचा विचार न करता केवळ बाह्य पाठिंब्याच्या भूमिकेत ठेवण्याचा हा डाव असल्याचा आरोपही अंतर्गत चर्चेत केला जात आहे.
अहवाल पाठवला
शिवसेना शिंदे गटाने पाठवलेल्या अहवालात भाजपच्या प्रस्तावातील त्रुटी, पदवाटपाचा अभाव, तसेच सत्तेतील सन्म ानाचा प्रश्न मांडण्यात आल्याचे समजते. महापालिकेतील संख्याबळ लक्षात घेता, सत्तेत सहभागी होताना निर्णयप्रक्रियेत स्थान व अधिकार मिळणे आवश्यक असल्याचे मत अहवालात नमूद असल्याची माहिती मिळाली आहे.
भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष यांनी नाशिक महापालिकेत महायुती म्हणून आपण सत्तेत सामील व्हावे, असा प्रस्ताव दिला आहे. मात्र त्यात सत्तापदांचा उल्लेख नाही. त्यामुळे सत्तेत साम ील व्हायचं की विरोधात बसायचं याबाबतचा अंतिम निर्णय शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहे.
अजय बोरस्ते, शिवसेना उपनेते तथा मनपा गटनेते
आपल्या देशात लोकशाही पद्धत आहे, त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर पदासाठी अर्ज नेले त्यात हरकत नाही. आम्ही त्यांना सत्तेत सामील होण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र त्यांनी पदे मागितली आहे. आम्ही कसे देऊ शकतो.
सुनील केदार, भाजप शहराध्यक्ष





