Thursday, July 30, 2026
Homeपडसादपडसाद: बोलाची कढी अन् बोलाचाच भात!

पडसाद: बोलाची कढी अन् बोलाचाच भात!

नाशिक | शैलेंद्र तनपुरे | Nashik
बो ले तैसा चाले, त्याची बंदावी पाऊले असे संत तुकारामांनी सांगितले असले तरी सांप्रतकाळी ‘गर्जेल तो पडेल काय’ अशी स्थिती असल्याने बोलल्याप्रमाणे कृती करणाऱ्यांची संख्या एवढी दुर्मिळ झालेली आहे की अशांच्या पावलांबर माथा टेकण्याची वेळच कधी येत नाही. राजकारणात तर ‘बोलाची कढी अन् बोलाचाच भात’ याचा एवढा बोलबाला झालेला आहे की ‘ठोकून देता ऐसा जे’ असेच वातावरण भारून राहिलेले आहे. निवडून आल्यावर प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा करणाऱ्यांनी नंतर हा तर निवडणूक जुमला होता असे सांगून मतदारांना ही बोलाचीच कढी ओरपायला लावली. पण अंधभक्तांना त्यांतही महान असे राष्ट्रकर्तव्य दिसल्याने हा बोलभांडपणा सध्या सगळीकडेच वाऱ्यासारखा पसरला आहे. हा शाब्दिक बोलभांडपणा करण्याला निमित्तही तसेच घडले.

गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. थोडक्यात काय तर ट्रिपल इंजिन सरकारचा बोलबाला आहे. राष्ट्र, राज्य अन् मनपा अशा तीन इंजिनाला शहरातील तीन आमदारांच्या शक्तीचेही इंधन मिळत आहे. थोडक्यात काय तर, जळी, स्थळी, काष्टी आणि अर्थातच पाषाणीही फक्त भारतीय जनता पक्षच शिल्लक आहे. सबब, ‘राजा बोले अन् दल हाले’ या उक्तीनुसार भाजपने काही ठरविले तर ते प्रत्यक्षात उतरायला कितीसा वेळ लागू शकेल. निवडणुकीतील त्यांची वक्तव्ये आठवा, लक्षात येईल की तुम्ही येथे निवडून दिले तर राज्य व राष्ट्रातील सत्तेचाही फायदा मिळेल, असे सांगितले गेले. लोकांनीही त्यावर विश्वास टाकला. प्रत्यक्षात काय झाले, तर नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा करून पालिकेच्या सत्तेवर घट्ट मांड ठोकणाऱ्या याच भाजपला आपण या शहराला दत्तक घेतले असल्याचाच चक्क विसर पडला आहे.

- Advertisement -

निओ मेट्रोची घोषणा करूनही बराच काळ लोटला. आता तर त्या घोषणेचाही विटाळ झाल्यासारखे वातावरण आहे. स्मार्ट सिटीच्या स्वप्नाची राखरांगोळी झाल्याचे पहावयास मिळत आहे. सिंहस्थाच्या कामांमुळे तर या स्वप्नांचा चिखलही अनुभवास मिळत आहे. स्मार्ट पार्किंगच्या भल्या मोठ्या घोषणांनी मध्यंतरी नाशिककर असेच खुशीत होते. शहरातील अनेक ठिकाणी पांढरे, पिवळे पट्टे मारून पार्किंगचे मार्किंग केले गेले. त्र्यंबकरोडवरील एक-दोन सिग्नलवर तर आडवे तिडवे असे काही पट्टे मारले गेले की त्याचा उलगडा पट्टे दिसेनासे होईपर्यंत कोणालाच झाला नाही. आता तर त्याच त्र्यंबकरोडची पार वाताहात झाली असून तेव्हा ते पट्टे कशासाठी मारले होते, हे आजही कळायला मार्ग नाही, गंगापूर रस्ता हा गेली काही वर्षे वाहतूक कोंडीचा नवा मॉडेल म्हणून पुढे आला. भरपूर टीकाटिप्पणी झाल्यानंतर काही ठिकाणी सिग्रल्स बसविले गेले. हे सिग्नल्स सिंक्रोनाइज्ड असल्याचे सांगितले गेले. बिच्चाऱ्या नाशिककरांना असे जड बोजड शब्द ऐकण्याचीही सवय यानिमित्ताने झाली, हा एकमेव फायदा सोडला तर या सिग्नल्सची सध्याची काय अवस्था आहे. तथाकथित सिंक्रोनाइज्ड व्यवस्थेचे काय झाले, हे विचारायचीदेखील कोणाचीच हिंमत नाही.

मध्यंतरी रविवार कारंजावरील नाशिकची एकेकाळची ओळख असलेल्या यशवंत मंडईचे पाडकाम केले गेले. इमारत जुनी व जीर्ण झाली होती, केव्हाही पडण्याची भीती होती वगैरे बरीच कारणे दिली गेली. त्याचवेळी त्या जागेवर बहुमजली पार्किंगची व्यवस्था होईल आणि त्यामुळे समस्त मेनरोड, कारंजा, अशोकस्तंभ, जुने नाशिक, महात्मा गांधी मार्ग वगैरे भागातील वाहतूक कोंडीचा विषय चुटकीसरशी सुटेल असे सांगितले गेले. मंडई तर इतिहासजमा केव्हाच झाली. आता त्या जागेवर खासगी लोक गाड्या पार्किंगमधून कमाई करीत आहेत. सामान्य नाशिककर अजूनही विचार करीत आहेत, की ही बहुमजली पार्किंग होणार तरी कधी. सांगितल्याप्रमाणे काम करतील ते राजकारणी कसले, असे या अनुभवामुळे लोकांच्या मनात येईलही.

भाजप हा शब्दाला पक्का असणारा पक्ष म्हणून स्वतःची पाठ नेहमीच थोपटून घेतो. नाशिकमध्ये मात्र हेच ‘शब्द बापुडे केवळ बारा’ ठरले आहेत. या सगळ्यांची निवडणुकीतील भाषणे काढा आणि त्यातील किती व काय झाले याची यादी करायला बसलो तर मती गुंग होऊन जाईल. हल्ली त्यांच्या हाताला हात लावून मम म्हणणारे शिवसेना व राष्ट्रवादी (अप) असे दोन पक्ष तयार झाले आहेत. गेल्या काही वर्षांत जे सांगितले गेले त्यातील नागरी जीवनासाठी अत्यावश्यक अशी कामे तरी करा, असे हे दोन मित्र सांगू शकतात. पण त्यांना तेवढाही अधिकार नाही किंवा त्यांना त्यात गम्यही नाही, विरोधी पक्ष म्हणून उबाठा, काँग्रेस व राष्ट्रबादी (शप) आणि इतर काही छोटे पक्ष आहेत, त्यांनाही या बोलघेवड्यांना त्यांचेच बोल त्यांच्याच घशात घालण्याची कधी शामत झाली नाही. साहजिकच, सध्या ज्यांच्याकडे पाहून बंदन करावे अशी पाऊले राहिली नाहीत असे जेव्हा वाटू लागते तेव्हा या अशा बोलघेवड्यांची हमखास आठवण येते आणि बोलाचाच भात खाऊ घालणाऱ्यांना आपण मतं दिली याबद्दल स्वतःचा धिक्कार करावासा वाटू लागतो.

ताज्या बातम्या