नाशिक | प्रतिनिधी
दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये आयोजित होणारा सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर घेऊन ठेवला आहे. त्याच्यासाठी मोठ्याप्रमाणात नियोजन सुरू असले तरी नाशिकला पालकमंत्री महत्वाचे असताना शासनाकडून त्यावर तोडगा निघत नसल्यामुळे त्याचा परिणाम कुंभमेळ्याच्या कामांवर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते ना. गिरीश महाजन यांची नाशिकचे पालकमंत्री म्हणून घोषणा केली होती, मात्र महायुतीतील पक्षांमध्ये बाद झाल्याने त्याला स्थगिती देण्यात आली आहे. सध्या मुख्यमंत्री दिल्लीच्या प्रचार दौऱ्यावर असल्यामुळे येत्या दोन दिवसांत हा बाद मार्गी लागण्याची शक्यता आहे.
राज्यात महायुतीचे सरकार असताना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतांना नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते ना. गिरीष महाजन यांची कुंभमेळा मंत्री म्हणून निवड झालेली आहे. मात्र त्या वेळी नाशिकचे पालकमंत्री सेनेचे ज्येष्ठ नेते दादा भुसे होते. तर आता विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार आले, मात्र मुख्यमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस झाले. तरी कुंभमेळा मंत्री म्हणून महाजनच कायम होते. त्यामुळे त्यांना पुन्हा पालकमंत्रीपद देण्यात आले होते.
मात्र यावर राष्ट्रबादी व शिवसेनेचे देखील दावा केल्याने सध्या त्याला स्थगीती देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीला मोठे यश मिळाल्यानंतर सरकार स्थापन करण्यास उशीर झाला. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार व त्यांच्या खातेवाटपाला देखील खुप वेळ लागला. तर विशेष म्हणजे पालकमंत्री निश्चित करण्यासही उशीर झाला. त्याचवेळी पालकमंत्री कोण होणार, याची मोठी उत्सुकता पहायला मिळाली.
२०२७ मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री होण्यासाठी चढाओढ होती. तरी पालक मंत्रीपद भाजपा आपल्याकडेच ठेवण्याची दाट शक्यता तेव्हापासून निर्माण झाली होती. ती खरी ही ठरली. मात्र नंतर शिवसेना आणि राष्ट्रबादी काँग्रेसकडून देखील नाशिकचे पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त झाल्यान महाजन यांच्या नियुक्तीला ब्रेक मिळाले. आता महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते बसून त्यावर तोडगा काढणार आहे. येत्या दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडी सरकारात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि शिवसेनेचे दादा भुसे जिल्ह्यातील मंत्री होते. तर भुजबळ यांना पालकमंत्री करण्यात आले होते. अडीच वर्षांनी सत्तांतर होऊन राज्यात महायुतीचे सरकार आले व मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे झाले. शिंदे सरकारमध्ये भुसे यांना पालकमंत्री करण्यात आले होते. त्यानंतर महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश झाल्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. मात्र त्यांना पालकमंत्री पद देण्यात आले नव्हते.
भाजपची मंत्रिपदाची पाटी कोरी
नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ आमदार असून त्यातील दोघांना तर शिवसेनेचे दोन आमदार असून त्यातील एकाला मंत्रीपद देण्यात आलेले आहे, मात्र भाजपचे पाच आमदार असूनही त्याना एकही मंत्री पद नाही. म्हणून भाजपचे ना. महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
सिंहस्थासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन भाजपन ना. महाजन यांच्याकडे पालकमंत्रीपद दिले होते. यापुर्वीचा त्यांचा पालकमंत्रीचा अनुभव आणि मुख्यमंत्री याचे जवळचे म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचा विचार करुनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची निवड केली असावी. मात्र आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा