Saturday, June 20, 2026
HomeराजकीयManikrao Kokate : "… तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांकडे राजीनामा देईन";...

Manikrao Kokate : “… तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांकडे राजीनामा देईन”; कृषिमंत्री कोकाटे असं का म्हणाले?

नाशिक | Nashik

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेच्या सभागृहात जंगली रमी खेळतानाचा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या व्हिडीओमुळे आणि त्यांनी आधी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे माणिकराव कोकाटे कृषिमंत्रीपदाचा राजीनामा देतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. परंतु, ही चर्चा निष्फळ ठरली आहे.

- Advertisement -

माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी आज (मंगळवारी) आपल्या नाशिक येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी कृषी विभागाच्या कृषी समृद्धी योजनेची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाच हजार कोटींची भांडवली गुंतवणूक करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. मात्र, त्याचा जीआर निघणे बाकी होते, तो आज निघाला, असं माणिकराव कोकाटे यावेळी म्हणाले. त्यानंतर कोकाटे यांनी जंगली रमीच्या (Rummy) व्हिडीओवरून सुरु असलेल्या वादासह राजीनाम्याच्या विषयावर भाष्य केले.

यावेळी बोलतांना कोकाटे म्हणाले की, “मुळात हा विषय छोटा आहे, तो इतका का लांबवला जात आहे हे मला समजत नाही. मी आधीही यावर खुलासा केला आहे. ऑनलाईन रमी (Online Rummy) काय प्रकार आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? तो खेळण्यासाठी तुम्हाला तुमचा नंबर, बँक अकाऊंट ऑनलाईन रमी खात्याशी जोडावं लागतं. माझ्या मोबाईलमध्ये (Mobile) गेमची जाहिरात लोड झाली. कारण नवीन मोबाईल होता, स्कीप कसा करायचा हे मला कळत नव्हतं. कुठेही चौकशी करा, ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरु झाली आहे, तेव्हापासून मी एक रुपयाची रमी खेळलेली नाही. किंबहुना मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत”, असा खुलासा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

पुढे बोलतांना कोकाटे म्हणाले की, “गेल्या २५ वर्षापासून मी विधानसभेचा (Vidhansabha) सदस्य आहे. त्यामुळे मला विधानसभेचे (Vidhansabha) सर्व नियम माहिती आहे.विधानभवनात काय करावं हे मला कळतं. माझा व्हिडीओ कुणी काढला त्यात मला जायचं नाही. या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांना लेखी पत्र देणार असून, सविस्तर चौकशी लावणार आहे. जर माझ्यावर आरोप सिद्ध झाले तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या कोणालाही न भेटता एका सेकंदात मी थेट राज्यपालांकडे (Governor) जाऊन माझ्या मंत्रिपदाचा (Minister Post) राजीनामा देईन”, असे त्यांनी म्हटले.

तसेच “या प्रकरणात माझ्या राजीनाम्याचा विषय येतोच कुठे. राजीनामा (Resignation) देण्यासाठी मी कुणाचा विनयभंग केला आहे का? माझ्या बदनामीमागे कोण आहे हे मी शोधून काढणार आहे. माझ्या बदनामीमागे मीडियाचे काही लोक देखील असू शकतात. त्यामुळे बदनामी करणाऱ्यांचे सीडीआर तपासणार आहे. तसेच ज्यांनी माझी बदनामी केली त्यांना मी कोर्टात खेचणार असून, त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. माझ्याबाबतीत असा इतिहास आहे की माझ्याविरोधात चुकीचे असे काही सापडलेले नाही”, असंही मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या नाराजीवर कोकाटे काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर बोलताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांना मी ब्रीफ केलेलं नाही हे खरं आहे. त्यांनी माध्यमांवर विश्वास ठेऊन प्रतिक्रिया दिलेली आहे”, असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Pawanraje Nimbalkar Case : पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल खासदार ओमराजेंच्या विरोधात;...

0
मुंबई | Mumbai गेल्या २० वर्षांपासून चाललेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी गृहमंत्री...