Sunday, August 30, 2026
HomeनाशिकDevendra Fadnavis : महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करणाऱ्या गोकुळ गितेंच्या घरी CM फडणवीसांची...

Devendra Fadnavis : महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करणाऱ्या गोकुळ गितेंच्या घरी CM फडणवीसांची भेट; नाशिकच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

नाशिक | Nashik

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) शुक्रवारी (दि.२८) रोजी नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) होते. त्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामे आणि धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन झाले. यावेळी फडणवीसांनी रात्री उशिरा दोन महिन्यांपूर्वी नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांचा पराभव करत अपक्ष निवडून आलेले आमदार गोकुळ गिते (Gokul Gite) यांच्या घरी भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

गिते बंधूंची खेळी अन् राजकीय रंगत

नाशिक विधान परिषद निवडणुकीदरम्यान गिते बंधूंच्या भूमिकेने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. या निवडणुकीच्या काळात नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सुरुवातीला भाजपचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाचा मान राखत, गणेश गिते (Ganesh Gite) यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली होती. मात्र, त्यांचे बंधू गोकुळ गिते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. निवडणुकीच्या (Election) शेवटच्या टप्प्यात त्यांनी पत्रकार परिषदेत प्रचार थांबवणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, प्रत्यक्ष निकालावेळी त्यांनी महायुतीचे दराडे यांचा पराभव करत विजयश्री खेचून आणला होता. महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करत मिळालेल्या या धक्कादायक विजयानंतर गोकुळ गिते यांनी शिवसेनेला सहयोगी सदस्य म्हणून पाठिंबा दिला होता.

भेटीमागील राजकीय गणितांवर चर्चांना उधाण

दरम्यान, ज्या बंडखोर आमदाराने (MLA) दोन महिन्यांपूर्वी महायुतीला मोठा धक्का दिला, त्याच गोकुळ गिते यांच्या घरी स्वतः मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गणेश गिते यांची माघार, गोकुळ गिते यांनी दिलेली लढत आणि त्यातून निर्माण झालेली नवी राजकीय समीकरणे, या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या या ‘सदिच्छा भेटी’मागे काही राजकीय संदेश आहे का? याबाबत नाशिकच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.

ताज्या बातम्या