त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar
त्र्यंबक नगरपरीषदेच्या निवडणुकीसाठी (Trimbakeshwar Nagar Parishad Election) शिवसेनेच्या उमेदवार त्रिवेणी तुंगार असून, त्यांच्याकडे विचार, विकास आणि विश्वास यांचा ‘त्रिवेणी’ संगम आहे. त्यांचे नाव त्रिवेणी तुंगार असल्याने त्या शिवसेनेचा अंगार आहे. धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत हे सांगण्यासाठी मी याठिकाणी आलो आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, त्र्यंबक शहराला पौराणिक आणि ऐतिहासिक आधुनिक विकासाचा बुस्टर आवश्यक आहे. याठिकाणी अनेक दुरावस्था असून आपल्याला जर काम करायचा असेल तर परिवर्तन घडवावे लागेल. याठिकाणी पर्यटना साठी जगभरातून संत महंत भक्त सगळे येत असतात. त्यांना सोयीसुविधा आपल्याला द्यायचे असेल तर इथे परिवर्तन आवश्यक आहे. आगामी काळात येथे सिंहस्थ होणार असून, त्यासाठी सगळी संत महंत मंडळी येणार आहे. ती देखील शिवसेनेसाठी सेवेची पर्वणी असून, याठिकाणी शिवसेनेच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आपल्याला विनंती करण्यासाठी आलो आहे. या ठिकाणी काही लोक बरीच आश्वासने देऊन गेले, परंतु मी आपल्याला सांगतो एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे, असेही शिंदे यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले, त्र्यंबकचे (Trimbak) रस्ते, दिवाबत्ती, पिण्याचे पाणी, भुयारी गटारी योजना यावर कोणीच काही बोलत नाही. नगरविकास मंत्री असताना येथील रस्त्यांसाठी ३९ कोटी रुपये दिले होते. परंतु,रस्त्यांचा दर्जा चांगला नाही. रस्ता चांगला पाहिजे, त्याचा सदुपयोग झाला पाहिजे. जे कोणी रस्त्याचे चुकीचे काम केले आहे त्यांचा शोध घ्या हा सगळा जनतेचा पैसा आहे तो वाया जाता कामा नये. कोणाची मक्तेदारी राहता कामा नये, जनतेचे राज्य आले पाहिजे. शहराच्या पाणीपुरवठा योजनेकरिता आचारसंहिता संपल्या संपल्या प्रस्ताव दाखल करा आणि तात्काळ पाणी द्या. शहरातील ऐतिहासिक तलाव कोरडे ठाक झाले आहेत, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
तसेच माझ्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या (CM Post) कारकिर्दीमध्ये राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरत होतो. अडीच तासांपेक्षा जास्त वेळ झोपलेलो नसेल. त्यामुळे त्र्यंबकमध्ये भगवा फडकविण्यासाठी आणि परिवर्तनाची लाट आणण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून द्या. बाकी निधीचा प्रश्न माझ्यावर सोडा तो कमी पडू देणार नाही. शिवसेनेचा जोरदार प्रचार पाहता येथे आपले उमेदवार शंभर टक्के निवडून येतील, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान, त्र्यंबक नगरपरिषदेसाठी शिवसेनेने नगराध्यक्षपदासाठी १ आणि नगरसेवकपदासाठी १२ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.




