नाशिक । प्रतिनिधी | Nashik
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांना भारतीय जनता पक्षाने पुन्हा महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. भाजपच्या (BJP) नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत डॉ. पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीतील पराभवानंतरही पक्षाने त्यांच्यावरील विश्वास कायम ठेवला असून, राष्ट्रीय संघटनेत महत्त्वाचे स्थान देत त्यांना पुन्हा राजकीय ताकद दिल्याचे मानले जात आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये (Nandurbar District) लोकसभा तसेच विधानसभेच्या अनेक जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. २०२४ च्या निवडणुकीत या पट्ट्यात महाविकास आघाडीने, विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने, चांगली कामगिरी केली. त्यामुळे या भागातील गमावलेली राजकीय पकड पुन्हा मिळवणे आणि आदिवासी मतदारांमध्ये पक्षाचा जनाधार मजबूत करणे, हे भाजपसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे.
या पार्श्वभूमीवर आदिवासी भागातील (Tribal Areas) राजकारणाचा अनुभव असलेल्या डॉ. भारती पवार यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी देणे भाजपच्या राजकीय रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. उत्तर महाराष्ट्रातील संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे आणि आदिवासी समाजात पक्षाविषयी पुन्हा विश्वास निर्माण करणे, या आघाड्यांवर त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे.
दिंडोरीतील पराभव ठरला मोठा धक्का
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांनी डॉ. भारती पवार यांचा पराभव केला. दिंडोरी हा भाजपचा मजबूत मतदारसंघ मानला जात असताना झालेला हा पराभव पक्षासाठीही मोठा धक्का ठरला. नाशिक आणि दिंडोरी परिसरातील स्थानिक नाराजीचा फटका डॉ. पवार यांना बसल्याचे त्यावेळी मानले गेले.मात्र, या पराभवानंतर त्यांना राजकीयदृष्ट्या बाजूला न करता भाजपने राष्ट्रीय संघटनेत महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे राष्ट्रीय उपाध्यक्षपद हे डॉ. पवार यांच्यासाठी केवळ संघटनात्मक सन्मान नसून उत्तर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय जम बसवण्याची संधी ठरणार आहे.
महिला नेतृत्वाचीही पक्षाला ताकद
डॉ. भारती पवार या व्यवसायाने वैद्यकीय डॉक्टर असून त्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री म्हणूनही काम केले आहे. उच्चशिक्षित महिला नेतृत्व, डॉक्टर आणि माजी केंद्रीय मंत्री अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील शहरी आणि निमशहरी भागात भाजपची प्रतिमा मजबूत करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा उपयोग होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली निराशा दूर करणे, संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि आगामी निवडणुकांसाठी पक्षाची तयारी वाढवणे, ही त्यांच्या नव्या भूमिकेतील प्रमुख आव्हाने असतील.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्व
राष्ट्रीय उपाध्यक्षपदामुळे डॉ. भारती पवार यांची भूमिका केवळ दिंडोरी किंवा नाशिकपुरती मर्यादित राहणार नसून राष्ट्रीय संघटनेतही वाढणार आहे. त्याचवेळी उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी पट्ट्यात भाजपचा प्रभाव वाढविण्याची जबाबदारीही त्यांच्या राजकीय अनुभवामुळे त्यांच्यावर राहण्याची शक्यता आहे.पराभवानंतर पुन्हा मिळालेली ही संधी डॉ. भारती पवार कितपत प्रभावीपणे वापरतात आणि त्यांच्या नेतृत्वातून भाजपला उत्तर महाराष्ट्रातील गमावलेली राजकीय ताकद परत मिळवून देण्यात किती यश येते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
वसुंधरा राजे सिंधिया, तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, डी. पुरंदेश्वरी, रेखा वर्मा, वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी, डॉ. भारती पवार, मनप्रीत सिंह बादल, लाल सिंह आर्य, प्रा. एम नागराज, प्रा. तारिक मन्सूर, डॉ. मधुचंद्र कर
राष्ट्रीय सरचिटणीस (महामंत्री)
विनोद तावडे, सुनील बन्सल, बिप्लब कुमार देब, स्मृती ईरानी, सतीश पूनिया, गजेंद्र पटेल, हरीश द्विवेदी, संजय भाटिया यांना राष्ट्रीय सरचिटणीस करण्यात आले आहे.




