नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महापालिका निवडणुकीत (Nashik NMC Election) एकमेकांच्या विरोधात लढलेले भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नाशिकमध्ये (Nashik) सत्तेसाठी एकत्र येतील, या चर्चांना मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी रविवारी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला. “जिथे आम्ही सोबत लढतो, तिथे सोबत सत्तेत जातो. मात्र नाशिकमध्ये आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो असल्याने येथे कोणत्याही कुबड्यांची गरज नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
हे देखील वाचा : Malegaon Politics : मालेगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी ‘यांची’ नावे निश्चित; उद्या अर्ज दाखल करणार
मंत्री महाजन म्हणाले की, नाशिक महापालिकेत भाजपचे (BJP) तब्बल ७२ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे महापालिकेतील सर्व महत्त्वाची पदे भाजपमधूनच दिली जाणार आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या संभाव्य सत्तास्थापनेच्या चर्चांना आता विराम मिळाला आहे. नाशिक महापालिकेच्या एकूण १२२ जागांपैकी भाजपने ७२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. शिवसेना (शिंदे गट) ला २६ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला केवळ ४ जागा मिळाल्या आहेत. महायुतीत असतानाही भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढवली होती, तर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाने युती करून निवडणूक लढवली होती.
हे देखील वाचा : Nashik Crime News : उसनवारी दिलेल्या तीस लाखांसाठी पेटवून घेत आत्महत्या
निवडणुकीनंतर भाजपने बहुमतापेक्षा दहा जागा अधिक जिंकत सत्तेवर आपला दावा मजबूत केला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाने सुरुवातीला विरोधात बसण्याची तयारी दर्शवली होती. दरम्यान, भाजपचे महाशहराध्यक्ष सुनील केदार यांनी केंद्र व राज्यात तिन्ही पक्ष सत्तेत एकत्र असल्याने नाशिक महापालिकेतही सत्तेत सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना शिंदे गट व अजित पवार गटाला केले होते. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने योग्य प्रस्ताव आल्यास विचार करू, अशी भूमिका घेतली होती. यामुळे उपमहापौरपद शिवसेना शिंदे गटाला दिले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र मंत्री महाजन यांच्या भूमिकेमुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
हे देखील वाचा : Nashik Fraud Crime : ‘नामको’त कर्ज घोटाळा; सहा प्रकरणांत वाहन तारण दाखवत एक कोटी रुपये लाटले
महापौराचा निर्णय मुंबईत
नाशिक महापालिकेचा अर्थसंकल्प कोण मांडणार, या पत्रकारांच्या प्रश्नावर मंत्री महाजन म्हणाले की, यासाठी अद्याप वेळ आहे. “आज मी मुंबईला जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून महापौर व इतर पदांबाबत निर्णय घेतला जाईल,” असे त्यांनी सांगितले. मात्र हा निर्णय नेमका कधी जाहीर होईल, याची तारीख त्यांनी स्पष्ट केली नाही.





