नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आजपासून (सोमवार) दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले होते. आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले होते. परंतु, राज ठाकरे यांनी नाशिक दौरा (Nashik Visit) अवघ्या तीन तासांत आटोपता घेत मुंबईकडे रवाना झाले आहेत. काही खासगी कारणासाठी ते मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज ठाकरेंचे आज सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास नाशिकमधील हॉटेल एसएसके येथे आगमन झाले होते. यानंतर त्यांनी शहरातील स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांशी देखील त्यांनी चर्चा केली. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी ही आढावा बैठक घेतली.
दरम्यान, या बैठकीनंतर राज ठाकरेंनी दुपारी पक्षाचे ज्येष्ठ नेते अतुल चांडक यांच्या घरी जाऊन जेवण केले. यानंतर तिथूनच ते मुंबईकडे (Mumbai) रवाना झाले. राज ठाकरेंनी दोन दिवसांचा नाशिक दौरा अवघ्या तीन तासातच उरकल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.