नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महापालिका निवडणुकीत (Nashik NMC Election) महाविकास आघाडीत (Mahaikas Aaghadi) अखेर मनसे हा नवा ‘भिडू’ येणार आहे. त्यादृष्टीने वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय होणार असल्याचे समजते. त्याचप्रमाणे जागावाटपदेखील होणार असल्याचे समजते. मविआत मनसे नको, अशी भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली होती. मात्र ती आता मवाळ होताना दिसत आहे, कारण भाजपला (BJP) सत्तेपासून रोखण्यासाठी सोबत लढावेच लागेल, असा सूर काही नेत्यांचा येत आहे. त्यामुळे नाशिकमध्ये तरी मविआत पाच पक्ष एकत्र मैदानात येणार असे दिसत आहे.
आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.विविध राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून संभाव्य युती, आघाड्या आणि स्वतंत्र लढती याबाबत जोरदार हालचाली सुरू आहेत. विशेषतः महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीमध्ये नव्या पक्षांना स्थान देऊ नये, अशी भूमिका यापूर्वी काँग्रेसकडून मांडली जात होती. मात्र, आता त्याच काँग्रेसकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत (MNS) मवाळ भूमिका घेतली जात असल्याची राजकीय चर्चा आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीपुरते का होईना मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेस सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे महाविकास आघाडी नाशिकमध्ये मनसे, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच डाव्या आघाडीच्या पक्षांचा समावेश असू शकतो, अशी चर्चा आहे. स्थानिक पातळीवर भाजपविरोधात ताकद एकवटण्याच्या उद्देशाने हा प्रयोग केला जात असल्याचे बोलले जात आहे. नाशिकसारख्या शहरात बहुपक्षीय राजकारण असल्याने युतीशिवाय सत्ता मिळवणे कठीण ठरू शकते, याची जाणीव सर्वच पक्षांना झाली असल्याचे दिसते.
सपा बाहेरच
दरम्यान, महाविकास आघाडीबाबत समाजवादी पक्षाची भूमिका मात्र स्पष्ट होत चालली आहे. मुंबईत समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आझमी यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका जाहीर केल्यानंतर नाशिकमध्येही समाजवादी पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होणार नसल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
भाजपला रोखण्यासाठी एकत्र
आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्ही महाविकास आघाडी अर्थात ‘इंडिया अलायन्स’चा भाग आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत सामावून घ्यायचे की नाही याबाबत निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. वरिष्ठ नेते जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य राहील, भाजपला रोखण्यासाठी नाशिकमध्ये भाजपविरोधात ताकद एकवटण्यावर आमचा भर राहील.
आकाश छाजेड, शहराध्यक्ष, काँग्रेस
मनसेसह पाच पक्ष एकत्र
आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार आहोत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, डावी आघाडी आणि मनसे असे पाच पक्ष एकत्र मैदानात येणार, याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे आणि अंतिम निर्णय लवकरच होईल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे जो आदेश देतील त्याप्रमाणे काम होणार आहे.
सुदाम कोंबडे, शहराध्यक्ष, मनसे




