नाशिक | Nashik
महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Nashik Municipal Coroporation Election) भाजपने (BJP) ७२ जागा मिळवत स्पष्ट बहुमतासह सर्वात मोठा पक्ष म्हणून मुसंडी मारली आहे. भाजप पाठोपाठ शिंदेंच्या सेनेला २६, ठाकरेंच्या शिवसेनेला १५, काँग्रेसला ०३, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ०४, मनसेला एक आणि अपक्ष उमेदवार एका जागेवर निवडून आला आहे. दरम्यान बहुमताचा जादुई आकडा पार केल्याने आता महापालिकेत सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर भाजपचा महापौर बसणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे महापौरपदासाठी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे.
अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikale) यांच्यातील एका संवादाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर शहरातील भाजप कार्यालयात मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत शुक्रवार (दि.१५) रोजी जल्लोष साजरा करण्यात आला. त्यावेळी मंत्री महाजन आणि आमदार ढिकले हे शेजारी बसले होते. यावेळी मंत्री महाजन हे आमदार ढिकले यांच्याशी कानगोष्टी करतांना दिसत आहेत.
त्यात आमदार ढिकले हे ‘साने निवडून आला म्हणजे अवघड आहे, तुमची कृपा, असे महाजन यांना म्हणताना दिसत आहेत. त्यावर मंत्री गिरीश महाजन हे ‘मुसलमानांमुळे झाले, ‘चिपड्या’ बोला साहब आपको पॅनल नही निकाल के दिया तो मुझे जेल मे डाल देना, अगर मैंने तुमको वोटिंग निकाल के नहीं दिया तो, असे म्हणताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच ‘आमदार’ बाई भेटू देत नव्हती’ असेही महाजन त्या व्हिडीओत शेवटी म्हणत आहेत. खासदार संजय राऊत यांनी महाजन आणि ढिकले यांच्यातील संवादाच्या व्हिडीओला ‘आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार’ असे कॅप्शन देखील दिले आहे.
दरम्यान, यंदा महापालिकेसाठी तब्बल ५६.७६ टक्के मतदान झाले होते. तर २०१७ मध्ये ६१.६० टक्के मतदान झाले होते. यात यंदा सुमारे ५ टक्क्यांची घसरण झाली होती. त्यामुळे वेगळे निकाल लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यातच आयाराम, गुन्हेगारांना पक्षात प्रवेश दिल्यावरून मंत्री गिरीश महाजन हे पक्षासह नाशिककरांच्या (Nashik) टीकेचे धनी झाले होते.तसेच पक्षातील बंडखोरी, तपोवन वृक्षतोड प्रकरणी घेतलेली वादग्रस्त भूमिका यावरून पक्षाच्या सहानुभूती दारांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता यामुळे यंदा भाजपला फटका बसणार असे बोलले जात होते. मात्र, मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आखलेले डावपेच हे सरस ठरल्याने नाशिकमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला.




