Saturday, May 30, 2026
HomeराजकीयNashik Politics : अखेर सुधाकर बडगुजरांच्या हाती 'कमळ'; पक्षप्रवेश करताच ठोकला शड्डू

Nashik Politics : अखेर सुधाकर बडगुजरांच्या हाती ‘कमळ’; पक्षप्रवेश करताच ठोकला शड्डू

मुंबई | Mumbai

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाशिक शहरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena UBT) माजी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा भाजप प्रवेश अखेर आज मुंबईत पार पडला. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. सुधाकर बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, नायना घोलप, माजी नगरसेवक दिलीप दातीर यांच्यासह आदी माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी सुधाकर बडगुजर म्हणाले की, “आज माझा भाजपमध्ये प्रवेश झाला, त्याबद्दल मी भाजपच्या नेत्यांचे आभार मानतो. मी समाजासाठी झटतो, समाजाची सेवा करतो. करोना काळात मी अनेक रक्तदान शिबीरे घेतली. कोणी बाहेर येत नव्हते त्यावेळी मी कोविड सेंटर सुरु केले. पक्षासाठी काम केले. परंतु, नियतीने घाला घातला आणि माझ्यावर कारवाई केली. ज्या पक्षाने माझा अनादर केला, त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल”, असे म्हणत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात शड्डू ठोकला.

पुढे ते म्हणाले की, “गिरीश महाजन, चंदशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण जे मार्गदर्शन करतील त्याचे पालन मी करेल. माझा आदराने या ठिकाणी प्रवेश झाला, त्यामुळे मी भाजप पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो. मंत्री गिरीश महाजन खऱ्या अर्थाने संकटमोचक आहेत. त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचे काम आहे, आपत्ती आली तर ते मार्ग काढतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी नागपूरचं एक उदाहरण देऊ इच्छितो, त्यांनी महाराष्ट्रात जो पहिला प्रकल्प केला की, सांडपाण्यापासून महापालिकेला उत्पन्न मिळवून दिलं, महावितरणला वीज निर्मिती प्रकल्प दिला. २०१०-११ ची ती गोष्ट आहे. २० ते २५ कोटी रुपये महापालिकेला मिळतात. अशी दुरदृष्टी असणारा नेता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची जनता खूश आहे”, असे म्हणत बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली.

दरम्यान, माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) म्हणाले की,”सुधाकर बडगुजर यांचा ठाकरे गटात अपमान झाला म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्या पक्षात वरिष्ठांचा मानसन्मान राखला जात नाही. त्यामुळे आगामी काळात विरोधकांना  आमची ताकद दाखवून देऊ”, असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...