नाशिक | विजय गिते | Nashik
महानगरपालिका निवडणूक (Mahapalika Election) म्हटले की, केवळ पक्षीय राजकारण नव्हे, तर स्थानिक समीकरणे, आरक्षणाचे गणित आणि राजकीय वारसा यांचीही चर्चा अपरिहार्य ठरते. यंदाच्या निवडणुकीत हे तिन्ही घटक अधिक ठळकपणे समोर आले असून, त्यामुळेच ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडीपुरती मर्यादित न राहता, राजकीय वारसदारांची भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारी ठरत आहे. त्यामुळे महानगरापालिका निवडणुकीत ‘वारसा’ विरुद्ध ‘मतदारांची पसंती’ ची कसोटी पहायला मिळणार आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये तीन महापौरांसह चार माजी उपमहापौर निवडणूक (Election) रिंगणात आहेत. याबरोबर महापौर व उपमहापौर पद भूषविलेल्या आठ जणांचे (मुलगा, मुलगी, पत्नी, भाऊ आदी) नातेवाईक निवडणूक रिंगणात आहेत. तसेच माजी मंत्री व आजी-माजी आमदार यांचा मुलगा मुलगी व नातेवाईक असे आठ जण निवडणूक रिंगणात उतरल्याने यंदाची निवडणूक लक्षवेधी ठरत आहे.
कुठलीही निवडणूक म्हटले की, आरक्षणाचा (Reservation) मुद्दा येतोच. त्यामुळे निवडणूक लढवताना बऱ्याच राजकीय लोकांचे व त्यांच्या समर्थकांची देखील मोठी अडचण होऊन जाते. यासाठी मग विविध मार्ग, क्लुप्त्या शोधल्या जातात. का तर हातची ‘जागा’ जायला नको! याचसाठी सगळा खटाटोप. याकरता मग जागांमध्ये अदलाबदल, पुरुषाच्या ठिकाणी महिला, पतीच्या ऐवजी पत्नी, मुलगी, मुलगा, नातेवाईक असे पर्याय ठेवले जातात.
हे देखील वाचा : Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची पोलिसात फिर्याद
याबरोबरच निवडणुकांमध्ये राजकीय नेत्यांचा ‘वारसा’ मग तो जनतेला मान्य असो नसो की, तोही पुढे चालवला जातो. यातूनच राजकीय व्यक्ती मग आपली पत्नी मुलगा, मुलगी व इतरांचे राजकीय पुनर्वसन व लॉन्चिंग करतात. असेच राजकीय पुनर्वसन लॉन्चिंग यंदाच्या निवडणुकीतही सर्वच पक्षांकडून करण्यात आल्याचे चित्र आहे. अशा राजकीय लोकांचे हे लॉन्चिंग मतदार काही ठिकाणी स्वीकारतात तर काही ठिकाणी नाकारतात. अशाही घटना ठिकठिकाणी घडल्याची अनेक उदाहरणे आहेत.
नाशिक महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीतही अनेक राजकीय घराण्याने आपले नातेवाईक राजकारणाच्या आखाड्यात उतरविले आहेत. यामध्ये अनेक जण राजकीय जुनेच खेळाडू असून काही नव्याने निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. यामध्ये महापौर, उपमहापौरपद भूषविलेले काही जण तर स्वतः तर काहींचे नातेवाईक निवडणूक रिंगणात उतरले आहेत. याबरोबरच माजी मंत्री, आजी-माजी आमदार (MLA) यांचे नातेवाईकही निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असून यामध्ये मतदार राजा कोणा कोणाला स्वीकारणार आणि कोणाला नाकारणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
निवडणूक रिंगणात कोण-कोण?
- निवडणूक रिंगणातील माजी महापौर नयना घोलप, रंजना भानसी व अशोक मुर्तडक.
- माजी उपमहापौर : प्रथमेश गिते, अजय बोरस्ते, गुरमीत बग्गा, रंजना बोराडे
- माजी महापौर, उपमहापौर असलेल्यांचे नातेवाईक : प्रथमेश वसंत गिते, संध्या सतीश कुलकर्णी, हितेश यतीन वाघ,
- मच्छिंद्र बाळासाहेब सानप, राहुल अशोक दिवे, प्रशांत अशोक दिवे, शाहू खैरे, हिमगौरी आहेर-आडके.
- माजीमंत्री, आजी-माजी आमदारांचे नातेवाईक : माजीमंत्री बबनराव घोलप यांची कन्या नयन घोलप, माजी आमदार वसंत गिते यांचे चिरंजीव प्रथमेश गिते, माजी आमदार अपूर्व हिरे यांची पत्नी योगिता हिरे, आमदार हिरामण खोसकर यांची मुलगी इंदुमती खोसकर-भोये, माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे चिरंजीव मच्छिंद्र सानप, आमदार डॉ. राहुल आहेर यांची भगिनी हिमगौरी आहेर-आडके, माजी आमदार नितीन भोसले यांची भावजयी रश्मी भोसले, आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे.




