नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा (Nashik Potholes) प्रश्न आता चांगलाच तापला असून, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे (NCP Ajit Pawar) नगरसेवक देखील आंदोलन करत आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नांवरून चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसने (NCP Youth Congress शहरात मंत्री छगन भुजबळ यांचे फलक लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांना नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. या लावलेल्या फलकामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे होर्डिंग वॉर
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने लावलेल्या फलकावर “दत्तक नाशिकचे पालक देवेंद्र फडणवीस साहेब, भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिककरांना खड्ड्यातून बाहेर काढा,ही सर्वसामान्य नाशिककरांच्या मनातील भावना आहे,” असा मजकूर आहे. यावरून आता महायुतीमध्ये नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून (Guardian Minister Nashik) रस्सीखेच सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.
… म्हणून भुजबळांना पालकमंत्री करावे – खैरे
दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे (Ambadas Khaire) यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की, “यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. त्यामुळेच त्यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे. सध्या नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी रिक्त असल्याने प्रशासनावर प्रभावी वचक ठेवू शकणारे, नाशिकची सखोल जाण असलेले आणि भूमिपुत्र असलेले छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करावी, अशी सर्वसामान्य नाशिककरांची भावना आहे, ” असे त्यांनी म्हटले.
गिरीश महाजन ॲक्शन मोडमध्ये
काही दिवसांपूर्वीच मंत्री छगन भुजबळ यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना रस्त्यांच्या रावस्थेबाबत आठवण करून दिली होती. त्यानंतर गिरीश महाजन यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना पुढील ८ ते १० दिवसांत शहरातील सर्व प्रमुख रस्ते खड्डेमुक्त करण्याचे कडक आदेश दिले आहेत.
ठाकरे गट आक्रमक; खड्ड्यांच्या प्रश्नावरील मोर्चाला दिला पाठिंबा
खड्ड्यांच्या प्रश्नावरून उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shivsena UBT) देखील आक्रमक झाली असून, त्यांनी ७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महापालिकेच्या विशेष महासभेला नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रेक्षक गॅलरीतून प्रशासनाला जाब विचारावा, असे आवाहन केले आहे. तसेच शिवसेना महानगरप्रमुख आणि नगरसेवक प्रथमेश गिते यांनी महापौरांकडे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांना महासभेत उपस्थित ठेवण्याची मागणी केली आहे. कुंभमेळा प्राधिकरणाच्या कामांमुळे नागरिकांना नाहक त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय ७ ऑगस्ट रोजी नाशिककर नागरिकांच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चाला ठाकरे गटाने पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.




